मंत्रालयातील ३,१९,४०० उंदीर सात दिवसांत कसे मारले? एकनाथ खडसे यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 06:05 AM2018-03-23T06:05:00+5:302018-03-23T06:05:00+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत करताच संपूर्ण सभागृहच अवाक् झाले.
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत करताच संपूर्ण सभागृहच अवाक् झाले.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना खडसे यांनी भाजपाचेच आमदार चरण वाघमारे यांनी माहिती अधिकारात काढलेली मंत्रालयातील उंदरांची धक्कादायक कहाणी सभागृहात मांडली.
मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याने आधी उंदरांची संख्या मोजण्यात आली. ती चक्क ३ लाख १९ हजार ४०० भरली. सहा महिन्यांत या उंदरांचा ‘बंदोबस्त’ करण्याचे ठरविले. प्रत्यक्षात कंत्राटदारास कार्यादेश देताना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आणि कंत्राटदाराने ही मोहीम अवघ्या सात दिवसांत फत्ते केली, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला.
एका मिनिटात ३१ मूषकांचा संहार
कंत्राटदाराचे उंदीर मारण्याचे कौशल्य लक्षात घेता ३ मे २०१६ ते १० मे २०१६ या कालावधीत (विद्यमान सरकारच्या काळात) दर मिनिटाला ३१.६८ उंदीर या प्रमाणे दरदिवशी ४५ हजार ६२८.५७ उंदीर मारण्यात आले. त्यात काही पांढरे, काही काळसर, काही मोठे, लठ्ठ तर काही अगदीच लहान होते, अशी वर्गवारी खडसे यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
दहा मांजरींमध्ये भागले असते... या उंदरांची विल्हेवाट कशी लावली याची माहिती मिळाली नाही. मोजमाप पुस्तिकेत सात दिवसांत त्यांचे निर्मूलन केल्याचे नमूद आहे. ज्या मजूर सहकारी संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते, त्या संस्थेने उंदीर मारण्याचे विष बाळगण्याची परवानगी घेतलेली नव्हती. हा खटाटोप करण्यापेक्षा मंत्रालयात दहा मांजरे सोडली असती तरी उंदीर मेले असते, असा चिमटाही खडसेंनी काढला.
मंत्रालयात तीन लाख, मग राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयांत किती असतील?
सात दिवसांत एवढे लाख उंदीर मारल्याचे दाखवून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, अशी उपरोधिक मागणीही खडसेंनी केली. एकट्या मंत्रालयात ३ लाख १४ हजार उंदीर असतील तर मग राज्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांतील उंदरांची संख्या किती, असा खोचक सवाल खडसेंनी करताच हशा पिकला.
खडसेंनी उपस्थित केलेल्या या ‘उंदीरकांडावर’ माहिती घेऊन ती सभागृहासमोर ठेवू, असे उत्तर सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले.
धर्मा पाटील यांनी तेच विष घेतले!
धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी मध्यंतरी मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या केली. त्यांनी हेच विष प्राशन केले होते, असा दावा खडसे यांनी केला. अर्थात उंदरांना विष देऊन मारण्याची मोहीम मे २०१६ मध्ये हाती घेण्यात आली होती आणि धर्मा पाटील यांनी जानेवारी २०१८ मध्ये विष घेतले होते. त्यामुळे खडसेंच्या विधानातील विसंगतीही यानिमित्ताने स्पष्ट झाली.