राष्ट्रपती राजवट उठवलीच कशी; सुशीलकुमार शिंदे यांची शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:14 PM2019-11-25T12:14:27+5:302019-11-25T12:16:21+5:30
राष्ट्रपतींनी सही केली ना नाही हे तपासावे लागेल; सुशीलकुमार शिंदे यांचे मत
सोलापूर : कोणताही घटनात्मक निर्णय घ्यायचा असेल तर त्याला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते़ राष्ट्रपती राजवट उठविल्यासंदर्भातही ही आवश्यक असते़ राजवट उठविण्यासंदर्भातही ही आवश्यक होती़ सकाळी सात वाजता शपथविधी झाला, याचा अर्थ राष्ट्रपतींनी पहाटे स्वाक्षरी केली असावी का असा संशय असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
सोलापुरात माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार युन्नुस शेख, निर्मलाताई ठोकळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सत्तास्थापनेसंदर्भात भाजपाने केलेली खेळी ही भारतीय घटनेचा खुनच आहे़ ज्या पध्दतीने शपथविधी झाला, ते पाहता मंत्रीमंडळाची बैठक झाली की नाही याबाबत साशंकता आहे.
राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी आवश्यक असते़ त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी हवी असते़ मात्र सत्ता स्थापनेच्या घडामोडी पाहता राजवट उठविण्याच्या आदेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे की नाही याबाबत शंका आहे, अशा अफवाही सुरू आहेत असा संशय माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.