जप्त केलेले पिस्तूल बाहेर पडले कसे?

By admin | Published: June 10, 2017 02:59 AM2017-06-10T02:59:06+5:302017-06-10T02:59:06+5:30

गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र एकच असल्याचा अहवाल बंगलोर फॉरेन्सिक लॅबने दिला आहे

How did the seized pistol fall out? | जप्त केलेले पिस्तूल बाहेर पडले कसे?

जप्त केलेले पिस्तूल बाहेर पडले कसे?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र एकच असल्याचा अहवाल बंगलोर फॉरेन्सिक लॅबने दिला आहे; त्या अहवालाची प्रत ‘सीबीआय’ने उच्च न्यायालयात सादर केली आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील पिस्तूल पुणे पोलिसांच्या कस्टडीत असताना ते बाहेर गेले कसे? त्यामध्ये कोणी पोलीस अधिकारी फुटीर झाला आहे काय? यासंबंधीची चौकशी ‘एसआयटी’ने का केली नाही? असे मुद्दे आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित केले.
सुमारे पाच तास युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पुढील सुनावणी १६ जूनला ठेवली. या वेळी दुसऱ्यांदा सरकार पक्षातर्फे म्हणणे सादर केले जाणार आहे.
समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर मागील सुनावणीत सरकार पक्षातर्फे म्हणणे सादर केले होते. त्यावर पटवर्धन यांनी म्हणणे सादर केले. गायकवाड याला अटक करून एक वर्ष नऊ महिने होत आहेत. तरीही दोषारोपपत्र निश्चित केले जात नाही. सरकार पक्षाने, ‘‘या गुन्ह्यातील संशयित विनय पवार व सारंग अकोळकर हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. मडगाव बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार रुद्रगोंडा पाटील याच्याशी समीरचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तो फरारही होऊ शकतो. या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे,’’ अशी कारणे पुढे करून जामीन मिळू दिला नाही. ज्योती कांबळे व सुमित खामकर यांच्या मोबाइलचे संभाषण ताब्यात मिळाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी समीरला अटक केली. पोलिसांनी इतका उशीर का लावला, असा सवाल त्यांनी केला.
दाभोलकर यांची हत्या २० आॅगस्ट २०१३ रोजी झाली. त्यानंतर काही दिवसांत पुणे पोलिसांनी शस्त्र तस्कर मनिष नागोरी याच्याकडून पिस्तूल जप्त केले. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे यांची हत्या झाली. या दोन हत्यांमध्ये १८ महिन्यांचा फरक आहे. पुणे पोलिसांत जप्त असलेले पिस्तूल पानसरे हत्येसाठी वापरले कसे? ते बाहेर गेले कसे? कोणी पोलीस अधिकारी फुटीर झाला आहे काय? याची चौकशी ‘एसआयटी’ने का केली नाही. काडतुसे आणि रिकाम्या पुंगळ्या स्कॉटलंड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठविल्याचे तपास यंत्रणेकडून सांगितले जात होते; पण त्या पाठविलेल्या नाहीत. गायकवाड याच्याविरोधात कसलेही पुरावे नाहीत. ‘एसआयटी’ने फक्त त्याच्याविरोधात माहोल तयार केला आहे, असेही पटवर्धन यांनी न्यायालयास सांगितले.

Web Title: How did the seized pistol fall out?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.