Uddhav Thackeray यांना मुख्यमंत्रिपद कसं मिळालं? काय घडलं त्या रात्री, Narayan Rane यांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 10:52 AM2021-10-21T10:52:32+5:302021-10-21T10:53:42+5:30
Maharashtra News: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा करावी, अशी विनंती Uddhav Thackeray यांनी Sharad Pawar यांना केली होती, असा दावा Narayan Rane यांनी केला आहे.
मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात जुगलबंदी रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपावर घणाघाती टीका केल्यानंतर आता नारायण राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. तसेच शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्रिपदी कसे बसले, याबाबतही राणेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. तर मीच त्यांचा हात उंचावून ते मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली होती, असा दावा शरद पवार यांनी केला होता. दरम्यान, नारायण राणे यांनी याबाबत वेगळाच दावा केला आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा करावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना केली होती, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे सांगतात मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. कसे केले हे आम्हाला माहिती आहे. शिवसैनिक त्याचे साक्षीदार आहेत. संजय राऊत जी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना घेऊन शरद पवार साहेबांच्या घरी पोहोचलात. त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कुणी शिवसैनिक नव्हता. तुम्ही तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, ‘साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहोत.’ याला राऊत यांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो.’ त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले.
यावेळी बाळासाहेबांसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या संबंधांवरूनही नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी काय काय थापा मारल्या. साहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलं म्हणून सांगतात. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, हा शब्द तुम्ही साहेबांना दिला. पण स्वत:च मुख्यमंत्री झालात. यापुढे ते शक्यच नाही. पण, भविष्यात चुकून संधी मिळाली, तर हे ठाकरे सोडून कोणालाच मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. साहेबांनी घातलेली शपथ मोडून दोनदा घर सोडून हॉटेल हॉलिडे इनमध्ये राहायला गेलेले साहेबांचा शब्द काय पाळणार? शिवसैनिकांना कदाचित ही बनवाबनवी समजणार नाही. पण माझ्यासारखे अनेक लोक या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यावेळी मी मध्यस्थी केली नसती, तर आता आपण कुठे असता? साहेबांच्या हयातीत जे पुत्रकर्तव्यास जागले नाहीत, ते साहेब गेल्यानंतर कसे काय पुत्रकर्तव्यास जागणार संजय राऊतजी? असा सवालही नारायण राणे यांनी विचारला.