काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 04:51 PM2024-11-16T16:51:31+5:302024-11-16T16:53:37+5:30
काँग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी आहेच. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतं ते निकालावर कळणार आहे. मंत्र्यांना निवडणूक सोपी नाही हे मात्र निश्चित!
सुनील पाटील
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघ तसा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र गेल्या दोन, तीन वेळच्या निवडणुका पाहता राष्ट्रवादी अन् अपक्षांनीच येथे बाजी मारली आहे. आताही मंत्री अनिल पाटील यांना कॉग्रेसपेक्षा अपक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांचेच तगडे आव्हान आहे. महाविकास आघाडीकडून कॉग्रेसचे डॉ. अनिल शिंदे रिंगणात आहेत.
या मतदारसंघात कॉग्रेस उमेदवाराला चार वेळा मतदारांनी आमदारकीची संधी दिली आहे. त्याखालोखाल भाजपला तीन वेळा तर जनता पार्टीला दोन वेळा आमदारकीची संधी मिळाली आहे. दोन वेळा अपक्ष निवडून आलेले आहेत. शिरीष चौधरी भाजपचे मानले जातात. स्थानिक भाजप कार्यकर्ते महायुतीसोबत राहतात की आतून चौधरींना मदत करतात याविषयी संभ्रम आहे.
काँग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी आहेच. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतं ते निकालावर कळणार आहे. मंत्र्यांना निवडणूक सोपी नाही हे मात्र निश्चित ! या मतदार संघात अलिकडच्या कालखंडापासून एक आमदार पुन्हा विजयी झालेला नाही. खास करून अपक्ष आणि त्यातल्या त्यात अमळनेर तालुक्यातील रहिवाशी नसलेल्या उमेदवारांनाच मतदारानी निवडून दिलेले आहे. स्थानिक असलेले बी.एस.पाटील हे सलग विजयी झालेले आहेत.
आता अनिल पाटील हे देखील स्थानिकच आहेत. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देतात हे पाहणे औत्सुकतेचे आहे.
लोकसभेला काय लागला होता निकाल?
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा खरंतर भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. यावेळी भाजपच्या स्मिता वाघ यांना २ ६८.५६ टक्के मतदान आणि ७१ हजार ७० मतांचे मताधिक्य मिळाले. सारबेटे गावाचा अपवाद वगळता उर्वरित अमळनेर शहर आणि तालुक्यात प्रत्येक गावात वाघ यांना मताधिक्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोदी आणि भाजप विरुद्ध लाट असतानाही भाजपच्या स्मिता वाघ यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातून आघाडी घेतली हे विशेष.