मी परीक्षा कशी देऊ?सातवीतील मुलाची एसटीसाठी याचिका
By admin | Published: March 23, 2017 03:15 AM2017-03-23T03:15:37+5:302017-03-23T03:15:37+5:30
वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत पुढील महिन्यापासून एसटी सेवा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) घेतल्याने,
मुंबई: वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत पुढील महिन्यापासून एसटी सेवा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) घेतल्याने, एका सातवीतील विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शाळेत जाण्याचे विशेषत: परीक्षेला वेळेत पोहोचता येणार नाही, या भीतीने सातवीच्या विद्यार्थ्याने महामंडळाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
बारा वर्षीय शॅरियन दब्रे हा भुईगावात राहातो. त्याच्या घरापासून शाळेत चालत जाण्यासाठी दीड तास एवढा वेळ लागतो. या भागात एसटीची बस सकाळी साडेसहा वाजता येते. ही बस पकडून शॅरियन व अन्य विद्यार्थी भुईगावापासून सहा कि.मी. दूर असलेल्या सेंट अॅन्थनी कॉन्व्हेंट शाळेत सकाळी ७: १० वाजता पोहोचतो. एप्रिल महिन्यात एसटीची सेवा रद्द झाल्यास, या विद्यार्थ्यांना एवढ्या सकाळी शाळेत जाण्यासाठी अन्य कोणतीच सुविधा नाही. परीक्षा काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने, आपण परीक्षेवर वेळेवर पोहोचू शकत नाही, या भीतीने शॅरियनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एसटीला निर्णय मागे घेण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी शॅरियनने याचिकेद्वारे केली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये एसटीने महापालिकेच्या हद्दीतून बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहितीही महापालिकेला दिली, तसेच त्यांना महापालिकेची बससेवा सुरू करण्यास सांगितले. मात्र, वसई-विरार महापालिकेने याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. यापूर्वी या भागात एसटीच्या ४८ फेऱ्या होत. मात्र, महापालिकेची स्थापना झाल्यानंतर, या फेऱ्यांची संख्या १४ वर आली आहे. महापालिकेच्या हद्दीतून एसटी सेवा उपलब्ध करायची असल्यास महामंडळाला महापालिकेकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या याचिकेवर लवकरच उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)