40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, यावर विश्वास कसा ठेवायचा ?- उद्धव ठाकरे
By admin | Published: June 26, 2017 10:52 AM2017-06-26T10:52:12+5:302017-06-26T11:08:38+5:30
40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26- राज्य सरकारने शेतकऱ्यांचं दीड लाख रूपयांपर्यतचं कर्ज माफ केलं आहे. या कर्जमाफीमुळे एकुण 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असा दावा सरकारने केला आहे. पण प्रत्यक्षात 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे का? तसंच या आकडेवारीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सरकारकडे याची पूर्ण आकडेवारी आहे ती त्यांनी सादर करावी तसंच कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफीनंतर कोरा झाला याचीही माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. नगर, नाशिकमधील शेतकरी अद्यापही त्रस्त आहेत त्याबाबत अभ्यासगट स्थापन करण्याच्या सरकारला सूचना देणार असल्याचं उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. तसंच कर्जमाफीच्या आंदोलनात ज्या प्रमाणे शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला त्याच प्रकारे प्रत्येकाने आपापल्या गावातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती उपलब्ध करून द्यावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य झाली. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहिली आणि यापुढेसुद्धा राहिलं. शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या सूचनांचा आणि मागण्यांचा पाठपुरावा शिवसेना करणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण या आंदोलनादरम्यान पुणतांब्यातील ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते तातडीने मागे घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच नियमितपणे कर्ज परत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे त्या मदतीत वाढ केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या पाठीशी शेतकरी आहेत त्यामुळे कर्जमुक्तीला फॅशन म्हणणाऱ्यांना कर्जमाफी करावीच लागली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना टोला लगावला आहे. जून 2016 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज राज्य सरकारने माफ केलं आहे पण आता जून 2017 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांचं कर्ज माफ करावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
औरंगाबादमधील संवाद यात्रेनंतर 29 जूनपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या सूचनांची आणि मागण्यांची माहिती घेतली जाणार आहे.