आम्ही काय गमावलं, हे शब्दात कसं सांगू?

By admin | Published: February 16, 2015 10:17 PM2015-02-16T22:17:24+5:302015-02-16T23:10:25+5:30

असा मित्र पुन्हा होणे नाही : भुर्इंजमधील आर. आर. पाटील यांचा ‘बेंचमेंट’ ढसाढसा रडला

How do we know what we have lost? | आम्ही काय गमावलं, हे शब्दात कसं सांगू?

आम्ही काय गमावलं, हे शब्दात कसं सांगू?

Next

सातारा/ भुर्इंज : आर. आर. पाटील यांचे निधन झाल्याचे भुर्इंजमध्ये समजले आणि अनेकजणांचे शब्दच गोठले. आर. आर. आबा यांचे मोठेपणच एवढे की, भुर्इंज गावातही त्यांच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला. आबां सोबतचा बेंचमेंट तर ढसाढसा रडला.इयत्ता आठवी वी ते अकरावी आर. आर. पाटील यांचे केवळ वर्गमित्रच नव्हे, तर बेंचमेंट असलेले येथील क. भा. पा. विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. पाटील म्हणाले, ‘आम्ही काय गमावलं, हे शब्दात कसं सांगू? आर. आर. हे माझे आठवी पासून अकरावी पर्यंत बेंचमेंट होते. शालेय शिक्षणाचा काळ सोडा; पण नंतर मी शिक्षण क्षेत्रात आलो आणि तो राजकारणात गेला. तो आमदार झाला, मंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला; पण आम्हा मित्रांना कधी विसरला नाही. मी महामार्गावरच्या शाळेवर होतो. माझे घरही महामार्गावरच. तो आवर्जून माझ्या घरी येई. भुर्इंज हे गाव काँग्रेसच्या विचाराचे प्राबल्य असणारे गाव आहे आणि येथील मानसिकता त्याला माहिती होती. त्यामुळे भुर्इंजमध्ये तो माझ्या घरी यायच्याबाबत टाळाटाळ करत असे. मी त्याला विचारले, ‘का रे बाबा माझ्याकडे का येत नाही? तर त्याने सांगितले, ‘तुला त्रास होईल म्हणून येत नाही.’ आर. आर. स्वत:च्या मित्रांच्याबाबतीत काळजी घेत होते ते एवढी. भुर्इंजशी आर. आर. आबा यांचे नाते वेगळे होते. त्यांचा जीवलग मित्र एवढेच नव्हे, तर बेंचमेंट असणारे आर. एस. पाटील येथे राहत असताना त्यांच्या घरी ते यायचे अगदी उपमुख्यमंत्री असतानाही ते यायचे; पण काँग्रेसच्या गावात राष्ट्रवादीचा नेता आला म्हणून त्याला त्रास होऊ नये, याची काळजी घ्यायचे. आपण कोणी तरी फार मोठे आहोत, याचा आव कधी त्यांनी आणला नाही.
आजही आपण पनवेल, खोपोली भागात गेलो तर काही कुटुंबामध्ये देव्हाऱ्यात आर. आर. पाटील यांचे फोटो दिसतील, असे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. ते का? अशी विचारणा केली असता, ‘डान्स बार बंदी केल्यामुळे पोरं घर विकायची बंद झाली म्हणून ‘आबाच आमचा देव’, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं, असेही त्या पोलिसाने सांगितले.
सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती केवळ कर्तृत्वाच्या जोरावर मोठी होते आणि अचानकपणे आपल्यातून निघून जाते हा सर्वच धक्कादायक प्रकार आहे. आर. आर. पाटील हे सर्वसामान्य कुटुंबातून स्वत:च्या कर्तृत्वावर मोठं झालेलं व्यक्तिमत्त्व होतं. २६/११ च्या हल्ल्यात भुर्इंजचे बापूसाहेब धुरगुडे शहीद झाले, तेव्हाही ते येथे आले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून गेले. असा माणूस गेला, हे अनेकांना विश्वासच बसत नाही. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील पोलिसांचे डोळे पाणावले...
पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातही आर. आर. पाटील यांच्या जाण्याने पाणी आलं. ते म्हणाले, ‘स्वत:च्या पदाचा कधीच रुबाब न करता वास्तवाशी भान जपण्याचं काम त्यांनी केलं. हे करताना त्यांनी नेहमीच आपल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच पोलिसांना आरोग्य कुटुंब योजना मिळाली. पोलीस दलातील कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांना उपचारासाठी कोणत्याही रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडेपर्यंत सारा खर्च शासनाने करण्याची व्यवस्था केली, ती आर. आर. पाटील यांनी. या एका कृतीमुळे अनेक पोलिसांनी लाच घ्यायचे बंद केले.

गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या आर. आर. पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. वक्तृत्वाच्या जोराजवर बहुजन समाजाचे नेतृत्व करण्याचे भाग्य त्यांना लाभले. ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविणारा नेत्याच्या निधनाने महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.
- श्रीनिवास पाटील, राज्यपाल, सिक्कीम

राजकारण, समाजकारणामधील एक तेजस्वी तारा आज निखळून पडला.आबांच्या जाण्याने आमच्यासह अनेकांचे प्रेरणास्थान लोप पावले आहे. आर. आर. आबांचा सहृदयी राजकारणाचा विचार सर्वानीच पुढे चालवणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.
-उदयनराजे भोसले, खासदार

दिलदार मनाचा प्रामाणिक नेता हरपला, एवढंच मी या क्षणी सांगू शकतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी यशस्वी केलेल्या अनेक सामाजिक मोहिमा आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. राज्याच्या प्रतिमा अधिकाधिक उंचविणाऱ्या या आबांची अजून गरज होती.
-शिवेंद्रसिंहराजे भोसले,
आमदार

पक्षीय पातळीपलीकडे माझे आबांसोबत खूप चांगले संबंध होते. महाराष्ट्राला एक वेगळं व्हिजन देण्याचं स्वप्न बऱ्याचवेळा त्यांनी बोलूनही दाखविलं होतं. सर्वसामान्यमधला असामान्य नेता, अशी त्यांची सर्वच थरात चांगली ओळख होती. आजारातून ते लवकरात लवकर बरे व्हावेत, असं आम्हा साऱ्यांनाच वाटत होतं. पण...
-जयकुमार गोरे, आमदार

प्रत्येक कार्यकर्त्याशी वैयक्तिक संपर्क ठेवणारा अजातशत्रू नेता गेला. महाराष्ट्रातील तमाम जनतेला राष्ट्रवादी पक्ष आपलासा वाटावा, यात आबांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळं केवळ पश्चिम महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात पोकळी निर्माण झाली आहे.
-शशिकांत शिंदे,
माजी पालकमंत्री


सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही आबांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. ते सामाजिक बांधिलकीशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. त्यांच्या अकस्मात जाण्यानं आमच्या पक्षासोबतच राज्याचेही खूप मोठे नुकसान झाले आहे.
- रामराजे नाईक-निंबाळकर,
माजी पालकमंत्री

Web Title: How do we know what we have lost?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.