स्वकीयांशी कसे लढू? - खडसे
By admin | Published: September 3, 2016 01:16 AM2016-09-03T01:16:10+5:302016-09-03T01:16:10+5:30
विकासाची गंगा येत असताना जिल्ह्याला दृष्ट लागली. दुसऱ्याने केले असते तर खंत नसती पण मी स्वकीयांशी लढू शकत नाही, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे
जळगाव : विकासाची गंगा येत असताना जिल्ह्याला दृष्ट लागली. दुसऱ्याने केले असते तर खंत नसती पण मी स्वकीयांशी लढू शकत नाही, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशी हतबलतेला मोकळी वाट करून दिली.
आपण असा काय गुन्हा केला की आपणास मंत्रिपदावरुन काढले, असा सवाल करीत त्यांनी स्वकीयांवर टीका केली. वाढदिवसानिमित्त तालुका क्रीडा संकुलात शुक्रवारी खडसे यांचा सत्कार झाला. त्यानंतर आयोजित सभेत ते म्हणाले, ४० वर्षे भाजपाची सेवा केली़ पक्षाचा चेहरा बदलून टाकला. त्यासाठी अनेक नेत्यांची साथ मिळाली. पक्षाने भरभरून दिले असले तरी आज फळ काय मिळाले? माणूस गद्दार होऊ शकतो. पक्ष नाही, असे सांगत आपण पक्षाचे कार्य करत राहू, असेही ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले की, पक्ष खडसे यांच्या पाठीशी आहे. सरकार आजही त्यांच्या शब्दाच्या पलीकडे नाही. फुंडकर,अडवाणी, महाजन, मुंडे यांनाही अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्याप्रमाणे खडसे हे सुद्धा या परीक्षेतून बाहेर येतील.
खडसे यांच्याविरुद्धचे हे षडयंत्र फार दिवस टिकणार नाही व ते पुन्हा मंत्रिमंडळात येतील. कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनीही खडसे लवकरच मंत्रिमंडळात परततील, असा विश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी)