Coronavirus: कोरोनामुळे घरातल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय?; ५० हजारांची मदत मिळवण्यासाठी करा 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:48 PM2021-12-01T20:48:21+5:302021-12-01T20:48:48+5:30

कोविड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.

How to get financial help of Rs 50,000 if a family member dies due to corona in Maharashtra | Coronavirus: कोरोनामुळे घरातल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय?; ५० हजारांची मदत मिळवण्यासाठी करा 'हे' काम

Coronavirus: कोरोनामुळे घरातल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय?; ५० हजारांची मदत मिळवण्यासाठी करा 'हे' काम

googlenewsNext

मुंबई –  गेल्या वर्षभरापासून जगातील सर्व देशांवर कोरोना महामारीचं संकट उभं राहिलं आहे. या महामारीनं लाखो लोकांचे जीव गेले. देशात आणि राज्यातही कोरोनामुळे अनेकांनी प्राण गमावलेत. अलीकडेच ठाकरे सरकारने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. ही रक्कम पात्र लोकांच्या बँकेत थेट जमा होईल असं सांगितले होते.

आता सरकारने ही मदत मिळण्यासाठी नागरिकांना सोप्पं जाईल अशी प्रक्रिया आणली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णय २६ नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online Web Portal विकसित केले असून, याद्वारे कोविड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.

कशी कराल प्रक्रिया?

यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्यांचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड १९ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे. अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल.

इतर प्रकरणी, कोविड-१९ मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-१९ मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावरअर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक 2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.

अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज ७ दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.

Web Title: How to get financial help of Rs 50,000 if a family member dies due to corona in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.