सवलतीचे एसटीचे तिकीट मराठीतून द्यायचे कसे?; वाहकांसमोर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:08 AM2019-05-04T05:08:28+5:302019-05-04T05:09:01+5:30
मशीनमधील बिघाडामुळे आदेशाचे पालने करणे अवघड
मुंबई : एसटीमधील कागदी तिकीट देण्याच्या पद्धतीला छेद देऊन ट्रायमॅक्स या खासगी कंपनीच्या मशीनमधून तिकीट देण्यात येते. मात्र मराठीतून तिकीट देताना सवलतीची यादी मराठीत दिसत नाही. येथील रकाना खाली दिसतो, असे वाहकांनी सांगितले. त्यामुळे तिकीट द्यायचे कसे, असा प्रश्न त्यांना सतावत असून इंग्रजी भाषेत तिकीट दिल्यास कारवाई होऊ शकते, अशी भीतीही त्यांना आहे.
तिकीट मशीनमधून तिकीट देताना वाहक मराठीऐवजी इंग्रजी भाषेतील तिकिटे प्रवाशांना देतात, अशा बऱ्याच तक्रारी यापूर्वी दाखल झाल्या होत्या. त्याची दखल घेत सर्व आगारांना मराठीत तिकीट देण्याच्या सूचना देण्यात याव्यात. इंग्रजीतील तिकीट देताना वाहक आढळल्यास खात्यामार्फत कारवाई करण्यात येईल, असा आदेश महामंडळाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून १६ एप्रिल रोजी उपमहाव्यवस्थापक यांच्या सहीनिशी परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या हंगामात एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातही सवलतीच्या दरात प्रवास करणारे जास्त असतात. एसटीच्या २७ विविध योजनेंतर्गत प्रवाशांना तिकीट दरात सवलत दिली जाते. मात्र, सवलतीच्या दरातील तिकीट मराठीतून येत नसल्याने करायचे काय, असा प्रश्न वाहकांकडून उपस्थित केला जात आहे. मशीनमधील बिघाडामुळे सवलतीचे तिकीट मराठीतून देण्याच्या उपव्यवस्थापकांच्या आदेशाचे पालन करणे त्यांच्यासाठी अवघड झाले आहे.
दरम्यान, मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आहे. तो दुरुस्त करण्यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात येणार आहे, असे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.