Uddhav Thackeray : भाजप शिंदे गटाचा उपयोग कसा करतोय? उद्धव ठाकरेंनी दिलं अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीचं उदाहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 07:25 PM2022-10-09T19:25:15+5:302022-10-09T19:26:39+5:30
उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेगटावर जोरदार हल्ला चढवला.
खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे गटाची, की एकनाथ शिंदे गटाची, हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचल्यानंतर, आयोगाने निर्णय होईपर्यंत शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. यानंतर, निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायांपैकी 3 पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाने आता चिन्हासाठी आणि पक्षाच्या नावासाठी आयोगाकडे पर्यायही दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेगटावर जोरदार हल्ला चढवला.
भाजप शिंदे गटाचा उपयोग करून घेतोय... -
भारतीय जनता पक्ष शिंदे गटाचा उपयोग कसा करून घेतोय? यासंदर्भात बोलताना उद्झव ठाकरे म्हणाले, अमिताभ बच्चन एका सरबताची जाहीरात करत आहेत. ती बाटली आपण विकत घेतो. बाटली घरी आणल्यानंतर, ती जपून वापरतो. फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र, त्या सर्बताच्या बाटलीतील सर्बत संपल्यानंतर, ती आपण कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. तसेच या गटाचे होणार आहे. एवढेच नाही, तर शिवतिर्थावरच्या सभेत सर्वांच्याच लक्षात आले आहे. की निष्ठावाण माणसं आमच्यासोबत आहेत. आता काही शिवसैनिकांना धमक्या येत आहेत. आणीबाणी पेक्षाही भयंकर प्रकार सुरू आहे.
चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण गोठवला, आईच्या काळजात कट्यार घुसवली -
उद्धव ठाकरे म्हणाले, काल निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, शिवसेनेचे नाव गोठवले आणि चिन्हही गोठवले. शिवसेना प्रमुख ज्या निवडणूक चिन्हाची धनुष्यबाणाची पूजा करत होते, तो धनुष्यबाण आजही त्यांच्या देव्हाऱ्यात आहे. पण चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाणही गोठवला. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेले रक्तच हवे. कारण शिवसेना म्हटले, की सळसळते आणि तापलेले रक्त. गोठलेल्या रक्ताची येथे गरजच नाही. उलट्या काळजाची माणसं, जी आज फिरत आहेत. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला. त्या आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली. अशा या उलट्या काळजाच्या माणसांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवले. या मागे जी महाशक्ती आहे, त्यांनाही आनंद होत असेल, की बघा आम्ही करून दाखवले. कशी ही माणसं, काय मिळवलं तुम्ही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या 3 चिन्हांना पसंती दिली असल्याचे आणि पक्षासाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(प्रबोधनकार ठाकरे) या 3 नावांचा पर्याय दिला असल्याचेही सांगितले.