उन्हाळ्याचे तीन महिने कसे सरणार?
By admin | Published: March 2, 2017 01:33 AM2017-03-02T01:33:07+5:302017-03-02T01:33:07+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे
दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. धरण, तलाव बंधाऱ्यातील पाणी संपले आहे. उन्हाळ्याचे तीन महिने कसे जाणार, या भीतीने या परिसरातील नागरिक हतबल झाला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील गुळणी, जरेवाडी वाफगाव, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, वरुडे, कनेरसर येथे दर वर्षी बेभरवशाचा पाऊस पडतो. यंदा परतीचा पाऊस या परिसरात पडलाच नाही. वाफगाव येथील मातीचे धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले होते; मात्र धरणातून पाणी चारीच्या वाटे सोडण्याचे नियोजन केले नसल्यामुळे; तसेच सतत या धरणातील पाणीउपसा असल्याने धरण कोरडेठाक पडले आहे. पाणी नसल्यामुळे शेतातील पिके जळून गेली आहेत. जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. गुळाणी येथील तलावातही १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येथे पाणीप्रश्न भेडवसणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वेळ नदी वरील वरुडे येथील कोल्हापूर पद्धतीचे दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत. मागील वर्षी एप्रिल, मे महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत निवडणुका जवळ आल्याने, अनेक पुढाऱ्यांनी या परिसरात पाण्याचे टँकर सुरू केले होते. मोफत गावोगावी-वाडी वस्त्यांवर पाणीवाटप करण्यात येत होते.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा; तसेच जनावरांचा पाणीप्रश्न मिटला होता. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत. जे निवडून आले, त्यांना या भागाचे काही देणे-घेणे नाही.
त्यांना आमची पाच वर्षे गरजच नाही, मोफत टँकरचे यंदा पाणी मिळणार नाही. ‘गरज सरो, वैद्य मरो’ अशी आमची अवस्था झाली असल्याचे वाफगाव परिसरातील शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रशासनाने या परिसरात टँकर लवकरच सुरू करावे, अशी मागणीही या वेळी शेतकऱ्यांनी केली.
>नाझरे धरणातून दिवसाआड पाणीपुरवठा
मोरगाव : पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणावर चार प्रादेशिक नळ पाणी योजना व एमआयडीसी अवलंबून आहे. धरणातील घटता पाणीसाठा लक्षात घेता, जूनपर्यंत पिण्याचे पाणी पुरण्यासाठी पाण्याचे दिवसाआड आठ तास असे नियोजन केले आहे. यामुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांत पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
नाझरे जलाशयावर बारामती तालुक्यातील मोरगाव प्रादेशिक, पारगाव -माळशिरस, नाझरे व इतर गावे, जेजुरी अशा विविध योजना आहेत. पैकी मोरगाव प्रादेशिक योजनेवर मोरगाव, आंबी खुर्द, आंबी बुद्रुक, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी (लोणी), जळगाव, काऱ्हाटी, कऱ्हावागज आदी १५ गावे अवलंबून आहेत.
या योजनांद्वारे पाणीपुरवठा दिवसाआड १२ तास चालविला जात होता; मात्र घटता पाणीसाठी लक्षात घेता जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी दिवसाआड या योजना ८ तास चालविण्यास सुरुवात केली आहे. तरडोलीसह परिसरातील १५ गावांसाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे या गावांत तब्बल चार दिवसांनी पाणी मिळणार असून, ग्रामपंचायतींना पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.
>पाण्यासाठी भटकंती सुरू
शिक्रापूर : पाबळ व परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली असून, अनेक वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाबळ येथील गावठाणात ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव मित्रमंडळाने एकत्रित येऊन पाण्याचा टॅँकर सुरू केला.