भटक्यांनी जगायचे कसे? पोट भरणे दूरच; अफवांमुळे बाहेर पडणेही मुश्कील
By गजानन दिवाण | Published: July 3, 2018 02:56 AM2018-07-03T02:56:30+5:302018-07-03T02:57:00+5:30
मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे.
- गजानन दिवाण
औरंगाबाद : मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे. धुळे जिल्ह्यात रविवारी पाच भिक्षुकांना ठेचून मारल्याच्या घटनेनंतर हा प्रश्न आणखी ज्वलंत झाला आहे.
नाथांच्या गोसावी वेशात टिंगरी, खंजेरी आदी वाद्ये वाजवीत भिक्षा मागणे हा या समाजाचा परंपरागत व्यवसाय. मात्र, यातून भिक्षा मिळत नसल्याने काही जण दत्तगुरूंच्या किंवा साईबाबांच्या मंदिराचा छोटासा गाडा तयार करतात व सोयीप्रमाणे तो बैलगाडी, चारचाकी टेम्पो किंवा दुचाकीवर बसवून कुटुंबासह गावोगाव भटकतात. श्रद्धाळू लोक देवदर्शन घेऊन दक्षिणा देत असतात. हेच त्यांचे उत्पन्न. काही जण जन्मत: पाच किंवा सहा पायांची गाय किंवा बैल घेऊन फिरतात. गावाजवळच्या मैदानात पाल ठोकून त्यांचा मुक्काम असतो. कुटुंबासह भटकंती असल्यामुळे बहुतांश मुले-मुली शाळाबाह्य आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथे भटके विमुक्त विकास परिषदेने या समाजातील काही कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे. काहींना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे प्रवासी रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करीत असल्याचे परिषदेचे सचिव नरसिंग झरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत समाजातील ४० हजार लोकांना जात प्रमाणपत्र दिले आहे. फक्त ८० कुटुंबांचा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रत्येक भटक्याला राहण्याचे हक्काचे ठिकाण आणि रोजगाराचे साधन मिळायला हवे, यासाठी परिषदेची लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभरात पालावरच्या चार शाळा
नाथपंथी डवरी समाजातील मुलांसाठी मुंबई, उस्मानाबाद, हिंगोली आणि पुणे येथे भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे पालावरच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काहीअंशी त्यांची शिक्षणाची सोय झाली असल्याची माहिती परिषदेचे सचिव नरसिंग झरे यांनी दिली.
कोथळज, हक्काचे एकमेव ठिकाण
भटके विमुक्त विकास परिषदेने हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथे पाच वर्षांपूर्वी या समाजातील ८० कुटुंबांचे पुनर्वसन केले. प्रत्येकी एक प्लॉट देऊन इंदिरा आवास योजनेतून काहींना घरेही बांधून दिली. नाथपंथी डवरी समाजाचे राज्यातील स्वत:चे हक्काचे हे एकमेव ठिकाण.
राहायचे कुठे आणि खायचे काय?
नारायण बाबर म्हणाले, चोरी-मारहाणीचे गुन्हे आमच्या नावावर कुठेच नाहीत. केवळ भिक्षुकी करून आम्ही पोट भरतो. शहरात गेलो, तर पोलीस ठाण्यात नोंद करतो आणि गावात पोलीस पाटलाकडे नोंद केली जाते. एवढे करूनही हल्ले होत असतील, तर राहायचे कुठे आणि खायचे काय?
- 52 घटक राज्यभरात भटक्यांमध्ये आढळतात. त्यातील रार्इंदर, घिसाडी, बहुरूपी, पोपटवाले, अस्वलवाले आदी २८ घटक अजूनही फिरस्तेच आहेत. नाथपंथी डवरी समाज हा त्यापैकी एक. या लोकांकडे ना जन्माचा दाखला आहे ना जातीचे प्रमाणपत्र. त्यामुळे अनेक कल्याणकारी योजनांचा त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. एकूण लोकसंख्येत भटक्यांची संख्या जवळपास ११ टक्के इतकी आहे.
नाथपंथी डवरी समाज २ लाखांच्या घरात
नाथपंथी डवरी समाज दोन लाखांच्या घरात आहे. महाराष्टÑात जवळपास सर्वच जिल्ह्यांत हा समाज आढळतो, पण स्वत:च्या नावे त्यांचे कुठेही घर वा शेत नाही.
हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथील गंगाराम राणोजी शिंदे, काशीराम शिंदे, नारायण बाबर हे उमाजी नाईकांचा पोवाडा म्हणून आपली उपजीविका करतात. महिनाभरापासून अफवांचे पीक वाढल्याने या समाजाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. भिक्षेसाठी समाजातील अनेक जण वेगवेगळ्या वेशभूषा, केशभूषा करतात. अफवांचा सर्वाधिक फटका त्यांना बसतो. घरातील कर्ती माणसे मारली जाऊ लागली, तर जगायचे कसे, हा त्यांच्या कुटुंबाचा सवाल?