साखर कारखाने विकून सहकार कसा टिकेल?
By Admin | Published: November 14, 2016 04:53 AM2016-11-14T04:53:55+5:302016-11-14T04:53:55+5:30
तीनशे ते चारशे कोटींचे कारखाने अवघ्या चाळीस कोटी रुपयांना विकले गेले, तर सहकार कसा टिकणार?, असा सवाल करत महाराष्ट्राची प्रगती वसंतदादांच्या विचारानेच होऊ शकते
सांगली : तीनशे ते चारशे कोटींचे कारखाने अवघ्या चाळीस कोटी रुपयांना विकले गेले, तर सहकार कसा टिकणार?, असा सवाल करत महाराष्ट्राची प्रगती वसंतदादांच्या विचारानेच होऊ शकते, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ येथे पाटील यांच्या हस्ते झाला. वसंतदादा स्मारकस्थळी सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.
पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान आहे. त्यांचे विचार जपले तरच राज्याची प्रगती होऊ शकते. सहकारी साखर कारखाने कवडीमोल दरात विकून काळ््या पैशांचीच निर्मिती होईल. हे थांबविले पाहिजे. त्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबवावा. अन्यथा जन्मशताब्दी कार्यक्रमाची औपचारिकता पार पाडण्यात काहीच अर्थ नाही.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, वसंतदादांनी उभारलेली सहकार चळवळ टिकली, तरच ती दादांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे. शेतीवरही प्राप्तीकर लागण्याची चिन्हे सरकारच्या धोरणांमुळे दिसत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, वसंतदादा हे कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे शासनानेच जन्मशताब्दी महोत्सव साजरा करावयास हवा होता, मात्र सरकार कोत्या मनाचे आहे.
वसंतदादांचे सरकार आम्ही पाडून दुसऱ्या विचारसरणीचे सरकार आणले. तरीही १९८३ ला दादा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला मंत्रीपद दिले होते. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यासमोर त्यांनी विनाअनुदानित शिक्षण संस्थांचा मुद्दा परखडपणे मांडला, असे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, असा नारा दादांनी दिला. आताच्या सरकारला लोकहिताच्या गोष्टींत रस नाही. ‘पैसा अडवा, विरोधकांची जिरवा’, या भूमिकेतून ते काम करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. (प्रतिनिधी)