४० लाख रुपये व्हॅट भरणारा सराफा व्यापारी चोर कसा?

By Admin | Published: August 14, 2014 01:18 AM2014-08-14T01:18:46+5:302014-08-14T01:18:46+5:30

चोरट्याकडून सोने खरेदी केल्याच्या आरोपाखाली सोनेगाव पोलिसांनी शहरातील चार प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांना मंगळवारी रात्री १० वाजता अटक केली. अटकेच्या निषेधार्थ नागपुरातील

How to make a bullion trader worth 40 lakh rupees? | ४० लाख रुपये व्हॅट भरणारा सराफा व्यापारी चोर कसा?

४० लाख रुपये व्हॅट भरणारा सराफा व्यापारी चोर कसा?

googlenewsNext

पोलिसांची चौकशी वादाच्या भोवऱ्यात : सराफांचा अनिश्चितकालीन बंद
नागपूर : चोरट्याकडून सोने खरेदी केल्याच्या आरोपाखाली सोनेगाव पोलिसांनी शहरातील चार प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांना मंगळवारी रात्री १० वाजता अटक केली. अटकेच्या निषेधार्थ नागपुरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला. बंद गुरुवार, १४ आॅगस्टला सुरू राहील, अशी माहिती इतवारी सोने-चांदी ओळ असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत हरडे आणि उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
वार्षिक ४० लाख रुपये व्हॅट भरणारा व्यापारी चोर कसा, असा पदाधिकाऱ्यांचा सवाल आहे. त्यामुळे पोलिसांची चौकशी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास विदर्भातील सराफा व्यापारी आपापली दुकाने अनिश्चितकालीन बंद ठेवतील, अशी माहिती महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी दिली.
व्यापाऱ्यांची सहआयुक्तांशी भेट
सराफा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी पोलीस सहआयुक्त अनुप कुमार यांची भेट घेतली आणि व्यापाऱ्यांची बाजू मांडली. हरडे यांनी सांगितले की, चोरट्याने बोट दाखविलेल्या सराफा व्यापाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात. सोने खरेदी केले नसतानाही त्यांना कोठडीत टाकण्याची धमकी देऊन पोलीस बळजबरीने व्यापाऱ्यांकडून सोने वसूल करतात. तत्कालिन पोलीस आयुक्त एसपीएस यादव यांनी अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये समन्वय असावा, या दृष्टीने दक्षता समितीची स्थापना केली होती.
पण या प्रकरणात सोनेगावच्या पोलीस निरीक्षकांनी समितीशी आमचे काहीही घेणेदेणे नसल्याचे सांगून व्यापाऱ्यांना अटक करून कोठडीत डांबले.
हा व्यापाऱ्यांवर अन्याय असून त्यांच्या सुटकेची मागणी पदाधिकाऱ्यांनी सहआयुक्तांकडे केली. या प्रकरणी जातीने लक्ष घालून व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सहआयुक्तांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
२०० ग्रॅम सोने खरेदीचा आरोप, दोन दिवस पीसीआर
चोरट्याने सांगितलेल्या चार सराफा व्यापाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. एकूण २०० ग्रॅम सोने चोरट्याकडून खरेदी केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. अटकेतील व्यापाऱ्यांना बुधवारी पोलिसांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी बी.वाय. बोरकर यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चारही जणांना शनिवारपर्यंत पीसीआर मंजूर केला. अटकेतील व्यापाऱ्यांमध्ये अनुप उदापुरे (अशोक उदापूर ज्वेलर्स, कॉटन मार्केट), मनीष पारेख (जे.डी. ज्वेलर्स, जुनी मंगळवारी), पुरुषोत्तम हेडाऊ (पुरुषोत्तम ज्वेलर्स, जुनी मंगळवारी) आणि अशोक मांजरे (अशोक मांजरे ज्वेलर्स) यांचा समावेश आहे. यापैकी अनुप उदापुरे यांनी गेल्यावर्षी ४० लाख रुपयांचा व्हॅट भरला आहे. सर्वजण प्रतिष्ठित व्यापारी म्हणून अनेक वर्षांपासून सराफा व्यवसाय करीत आहेत. मात्र या घटनेत पोलिसांनी चौकशी न करता चोरट्याच्या म्हणण्यावरून व्यापाऱ्यांच्या अटकेची कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. या प्रकरणी अ‍ॅड. प्रदीप सोनटक्के, अ‍ॅड. मनोज कुल्लरवार यांनी न्यायालयात व्यापाऱ्यांची बाजू मांडली.
चौघांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे
चौघाही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चोरट्याने दुकानाकडे बोट दाखविले असले तरीही या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची बारकाईने चौकशी करण्याचे सौजन्य पोलिसांनी दाखविले नाही. चोरट्याने पोलिसांना सांगितली तारीख व वेळेत काहीही ताळमेळ बसत नाही. एवढेच नव्हे तर संबंधित तारखेच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतरच्या फुटेजमध्ये चोरट्याचे छायाचित्र सोडा, त्याने दुकानात पाऊल टाकल्याचे फुटेजमध्ये दिसले नाही. त्यानंतरही पोलीस व्यापाऱ्यांवर दबाब टाकून बळजबरीने सोने वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा दबाब कधीही सहन करणार नाही, असे पदाधिकाऱ्यांनी इतवारी सराफा ओळ येथे दुपारी झालेल्या व्यापाऱ्यांच्या सभेत सांगितले. (प्रतिनिधी)
विविध संघटनांचे बंदला समर्थन
नवयुवक सराफा महाराष्ट्र सुवर्णकार संस्था, महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महासंघ आणि भारतीय सुवर्णकार समाजाने बंदला समर्थन दिले. चोरीचा माल खरेदी केल्याच्या आरोपाखाली गेल्या काही महिन्यांपासून पोलीस व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. चौकशीसाठी ठाण्यात बोलाविलेल्या सराफा व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ व्यापारी मोठ्या संख्येने मंगळवारी पहाटेपर्यंत सोनेगाव ठाण्यात होते. अखेर पोलिसांच्या बळजबरीचा निषेध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद आंदोलनाचा निर्णय घेतला.
दक्षता समितीकडे पोलिसांचा कानाडोळा
पोलिसांच्या बळजबरीच्या वाढत्या घटनांमुळे काही वर्षांआधी व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन पुकारले होते. अशा घटनांमध्ये पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये समन्वय राहावा, या हेतूने तत्कालिन पोलीस आयुक्त एसपीएस यादव यांनी दक्षता समिती स्थापना केली होती. या समितीचे कार्य निर्विवाद सुरू होते. पण गेल्या काही महिन्यांपासून पोलीस व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देत असल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. याआधीही इतवारीतील एका सराफाला अशाच प्रकरणात छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती. त्रास नको म्हणून चोराने सांगितलेले काही ग्रॅम सोने या सराफाने पोलिसांना दिले. याशिवाय नंदनवन पोलिसांनीही एका सराफाकडून साडेपाच ग्रॅम सोने वसूल केल्याची माहिती आहे.

Web Title: How to make a bullion trader worth 40 lakh rupees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.