खारोडी गावठाण झोपडपट्टी कसे?
By admin | Published: May 20, 2016 02:40 AM2016-05-20T02:40:26+5:302016-05-20T02:40:26+5:30
‘लोकमत आपल्या दारी’ या मुंबईतील ‘लोकमत’च्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी रात्री मालाड (प.) येथील मालवणी गावात दणक्यात झाला
मनोहर कुंभेजकर / गौरी टेंबकर,
मुंबई-नागरिकांना समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ म्हणून ‘लोकमत आपल्या दारी’ या मुंबईतील ‘लोकमत’च्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी रात्री मालाड (प.) येथील मालवणी गावात दणक्यात झाला. मालवणी आणि खारोडी परिसरातील चारशेहून अधिक रहिवासी या वेळी उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. खारोडी गावठाणला झोपडपट्टी म्हणून पालिकेने घोषित केले आहे. या निर्णयाविरुद्धच्या संतप्त भावना या वेळी रहिवाशांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केल्या.
मालवणी येथील सेंट
अँथोनी चर्चच्या मैदानात सेव्ह अवर लॅण्ड, वॉच डॉग फाउंडेशन आणि द बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या समस्या ‘लोकमत’च्या माध्यमातून सुटण्यास मदत
होईल, असा विश्वास येथील रहिवाशांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. येथील रस्ता रुंदीकरणात ५५ घरे बाधित होणार आहेत. हे रस्ता रुंदीकरण नेमके कुणासाठी, असा सवाल करत नागरिकांनी पालिकेविरुद्ध शिमगा केला.
या वेळी व्यासपीठावर ‘सेव्ह अवर लॅण्ड’च्या डॉल्फी डिसोझा, गर्ग परेरा, स्टॅन्ली फर्नांडिस, वॉच डॉग फाउंडेशनचे संचालक अॅड. ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा, द बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशनचे ब्रायन परेरा, अँथोनी चर्चचे फादर आॅस्टीन फर्नांडिस, मालवणी बीसीएस युनिटचे शिफ्रा पटेल, मुंबई नागरिक मंचच्या जयश्री, ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, शहर संपादक राहुल रनाळकर, वितरण विभागाचे अधिकारी हारून शेख आणि शरद सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
।रस्ता रुंदीकरण गावठाणाच्या बाजूला जास्त
गर्ग परेरा म्हणाले की, खारोडी गावठाण झोपडपट्टी म्हणून कोणत्या आधारावर महापालिकेने घोषित केले याची माहितीच्या अधिकारात पालिकेकडे वारंवार लेखी विचारणा केली; पण पालिकेने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. खारोडी येथील रस्ता रुंदीकरण दोन्ही बाजूला समान अंतरात असले पाहिजे. मात्र येथील रस्ता रुंदीकरण हे येथील गावठाणाच्या बाजूला जास्त प्रमाणात होत आहे. आमच्या गावठाणांमधील बाधित ५५ घरे राहिलीच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
येथील चॅपेलचा भूखंड मदर तेरेसा क्रीडांगण म्हणून २००१ साली पालिकेने घोषित केलेला आहे. मात्र ही जागा राजकारणी व्यक्तींनी दुसऱ्या नावाने हडप केल्याची माहिती त्यांनी दिली. कांदिवली (प.) येथील पोईसर चर्चची जागा पालिकेला रस्ता रुंदीकरणासाठी हवी आहे. कारण येथे पोईसरनदीजवळ उभ्या राहत असलेल्या ३२ मजली इमारतीसाठी हा डाव पालिकेने आखला असल्याचा आरोप करून याविरोधात लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची भूमिका त्यांनी या वेळी जाहीर केली.
।या कार्यक्रमाचा समारोप करताना विनायक पात्रुडकर म्हणाले की, चारशे वर्षांपूर्वीच्या खारोडी गावठाणांबद्दल रहिवाशांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आपल्या समस्या ‘लोकमत’ निश्चितच सातत्याने मांडेल. तुमची घरे जाणार नाहीत, यासाठी पालिकेसह सरकारवर ‘लोकमत’ दबावगट म्हणून तुमच्या पाठीशी राहील. नवी मुंबईत जशी पुनर्वसनाची आकर्षक योजना आहे, तशी योजना पालिकेने आणून बाधित नागरिकांना आधी विश्वासात घेतले पाहिजे. दीर्घकाळ एकजुटीने लढा द्या, पुढचा विजयी मेळावा ‘लोकमत’ आपल्यासोबत येथेच साजरा करेल, अशीही ग्वाहीदेखील त्यांनी दिली.