किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ येणार?

By admin | Published: March 31, 2017 07:35 PM2017-03-31T19:35:37+5:302017-03-31T19:56:41+5:30

भाजपा सरकारच्या काळात 9 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

How many farmers will get the right time for debt relief after suicides? | किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ येणार?

किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ येणार?

Next

ऑनलाइन लोकमत
हिंगोली / वाशिम, दि. 31 - भाजपा सरकारच्या काळात 9 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफीची योग्य वेळ आलेली नाही. नेमक्या किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ येणार आहे? असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला केला आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा आज मराठवाड्यात दाखल झाली. हिंगोली येथील जाहीर सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्याच्या विविध भागात रोज शेतकरी आत्महत्या करतायेत. पण सरकार शेतक-यांना दिलासा देण्यासाठी काहीच करत नाही. 2013साली आमच्या सरकारच्या काळात प्रचंड दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी आम्ही 10 लाख जनावरे चारा छावणीत सांभाळली. शेतक-यांसाठी राज्याची तिजोरी उघडी केली होती. भाजपा सरकारने उद्योगपतींची 1 लाख 17 हजार कोटींची कर्जे माफ केली, पण शेतक-यांचे 30 हजार कोटी रुपयांचे कर्ज हे सरकार माफ करत नाही. शेतक-यांना मदत करण्याची या सरकारची दानत नाही, असे चव्हाण म्हणाले.

याच सभेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा जोरदार समाचार घेतला. जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. या सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निवडणुकीत आश्वासन देऊनही सरकार शेतीमालाला हमीभाव देत नाही. खासगी बाजार समित्या आणून शेतक-यांची लूट करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे. या सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असून यांच्या मनात नथुराम आहे अशी जळजळीत टीका पवार यांनी केली.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. लोकांना फसवून त्यांची मते घेऊन मोदी पंतप्रधान झाले, पण लोकांचे अच्छे दिन काही आले नाहीत. भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला असून विरोधकांचा आवाज दाबून हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.  शेतक-यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

दरम्यान, आज तिस-या दिवशी संघर्ष यात्रा विदर्भातील सहा जिल्ह्यातून मार्गक्रमण केल्यानंतर हिंगोलीमार्गे मराठवाड्यात दाखल झाली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड, मालेगाव, मंगरूळपीर आदी ठिकाणी संघर्ष यात्रेचे शेतक-यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. मार्गातील खेड्यापाड्यातही अनेक शेतकरी रस्त्यावर संघर्ष यात्रेच्या प्रतिक्षेत उभे होते. मराठवाड्यात सात जिल्ह्यात प्रवास करून ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे. या संघर्ष यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पिपल्स रिपब्लीकन पार्टी एमआयएम या सर्व विरोथी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.

Web Title: How many farmers will get the right time for debt relief after suicides?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.