आणखी किती प्रवाशांचे जीव घेणार? संतप्त सिंधूताई सपकाळांचा IRBला सवाल
By Admin | Published: January 19, 2017 08:13 AM2017-01-19T08:13:40+5:302017-01-19T08:52:33+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील धोकादायक प्रवासाबद्दल ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी आयआरबीच्या अधिका-यांना फैलावर घेतले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असून आत्तापर्यंत झालेल्या अपघातांत शेकडो जणांना जीव गमवावा लागला. याच मुद्यावरून ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ संतप्त झाल्या असून त्यांनी थेट आयआरबीच्या अधिका-यांनाच फैलावर घेतले.
काल रात्रीच्या सुमारास सिंधूताई मुंबईहून पुण्याला जात असताना त्यांच्या डोळ्यांसमोरच एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात होता होता टळला. त्या गाडीमध्ये लहान मुलांसह वीसच्या जवळपास महिलांचा समावेश होता. यामुळे संतापलेल्या सिंधूताईंनी तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावरील टोल कर्मचा-यांना झापले. 'नागरिक एवढे पैसे भरतात, तरीही तुम्ही त्यांना चांगली व्यवस्था देऊ, सुरक्षित प्रवास देऊ शकत नाही. आत्तापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत' अशा शब्दांत त्यांनी कर्मचा-यांना सुनावले एवढेच नव्हे तर त्यांनी आयआरबी अधिका-यांनाही फोन करून फैलावर घेतले. ' आणखी किती प्रवाशांचा जीव घेणार आहात?' असा खडा सवाल संतप्त सिंधूताईंनी अधिका-यांना विचारला.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येत्या आठ दिवसांत योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर हजारो लोकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करेन, असा इशाराही त्यांनी दिला.
विशेष म्हणजे केंद्र सरकारचा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु असतानाच ही घटना घडली असून सिंधुताईंच्या इशा-यानंतर तरी काही सुधारणा होते का हे पुढील काळात बघावे लागेल.