आणखी किती जीव जाण्याची वाट बघणार? ,उच्च न्यायालय संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 04:09 AM2017-08-04T04:09:22+5:302017-08-04T04:09:30+5:30

रस्त्यांची खराब अवस्था व खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईत २० जणांचा मृत्यू झाला. यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले.

How many more will be waiting for life? High court furious | आणखी किती जीव जाण्याची वाट बघणार? ,उच्च न्यायालय संतप्त

आणखी किती जीव जाण्याची वाट बघणार? ,उच्च न्यायालय संतप्त

Next

मुंबई : रस्त्यांची खराब अवस्था व खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईत २० जणांचा मृत्यू झाला. यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. ‘पुढील पावसाळ्यापर्यंत किती जणांना मृत्यूच्या खाईत ढकलणार?’, असा उपरोधिक सवाल न्यायालयाने मुंबई मनपाला केला.
ही स्थिती केवळ मुंबई महापालिकेची नाही, तर राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांची आहे. त्यामुळे आम्ही त्या सर्वांना प्रतिवादी करत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबईतील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत विद्यमान न्यायाधीश गौतम पटेल यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून कळवले. न्यायालयाने याचे जनहित याचिकेत रूपांतर केले. ‘मुंबईतील रस्त्यांवरून प्रवास करणे, नकोसे वाटते. मुंबईच्या रस्त्यांच्या दुर्दशेवरून राज्यातील रस्त्यांचा अंदाज आला आहे,’ अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
‘उद्यापासून मीच माझ्या नेहमीच्या रस्त्यावर किती खड्डे लागतात, याची मोजदाद करेन, असे प्रत्येक मुंबईकराने केले तर मुंबईत किती खड्डे आहेत ते कळेल आणि महापालिकेलाही ते समजेल,’ असेही न्यायालयाने म्हटले. त्यावर महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी आतापर्यंत ५०० तक्रारी आल्याचे सांगताच; न्यायालयाने, ‘तक्रारी किती आल्या? यापेक्षा किती तक्रारींचे निवारण केलेत? ते सांगा,’ असा सवाल केला.
खड्ड्यांची तक्रार करण्याचे आवाहन
खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती असल्याचे साखरे यांनी सांगताच, न्यायालयाने समिती अस्तित्वात आल्यानंतर किती जणांचा मृत्यू झाला? याची माहिती मागितली. तुमच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आम्हालाच देखरेख समिती नियुक्त करावी लागेल. तुमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे न्यायालयाने म्हटले.
परिसरातील खराब रस्त्यांची तक्रार महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाकडे करण्याचे आवाहन न्यायालयाने नागरिकांना केले. यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने प्राधिकरणाला दिले.

Web Title: How many more will be waiting for life? High court furious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.