सरस्वतीनं किती शाळा काढल्या, किती लोकांना शिकवलं?; छगन भुजबळांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 04:07 PM2022-11-28T16:07:10+5:302022-11-28T16:16:01+5:30
पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त 'महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा २०२२' पार पडला. त्यावेळी भुजबळ बोलत होते
पुणे - शाळांमध्ये सरस्वतीचं पूजन का? पूजा करायची तर ज्यांनी राज्यक्रांती घडवली छत्रपती शिवाजी महाराज, सामजिक क्रांती घडवली ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी कायदा तुम्हाला दिला त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करा. ज्यांनी महिलांच्या शिक्षणाचा १५० वर्षापूर्वी पुरस्कार केला त्यांची पूजा करा. भाऊराव पाटलांची पूजा करा. लाखो लोक आज शिकून मोठे होतायेत. अण्णासाहेब कर्वेंची पूजा करा. सरस्वती कुठून आली? किती शाळा काढल्या. किती लोकांना शिकवलं? मग त्यांनी हे दिले आहे असं आपण मानतो. मग महात्मा फुले यांना हे पाऊल का उचलावं लागलं? त्याच्या अगोदर त्या सगळ्या समाजाला शिक्षण का मिळालं नाही. ब्राह्मण समाजातील महिलांनाही शिक्षण का मिळत नव्हतं. केवळ पुरुषांना शिक्षण एवढेच काम होते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.
पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त 'महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा २०२२' पार पडला. त्यावेळी भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, निफाडमध्ये एका शाळेच्या कार्यक्रमाला गेलो तिथे समोर सरस्वतीचा फोटो, त्याची पूजा मग मी नाही करत सांगितले. शिक्षकच असे असतील तर विद्यार्थ्यांचे काय? दिनदलितांच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमेव प्रभावी अस्त्र-शस्त्र आहे. बाकी अंधश्रद्धा आहे त्या जातच नाही. ओह माय गॉड सिनेमा मी पाहिला होता. त्याच्या दुकानाला आग लागली तेव्हा देवानं नुकसान भरून द्यावं असे त्याने सांगितले. देव आम्हाला सगळं देतो मग आग पण त्यानेच लावली त्याने द्यावं ना असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत आपण ब्राह्मणाच्या विरोधात नाही. ब्राह्मणवादाविरोधात फुले होते. ब्राह्मणांविरोधात नव्हते. कारण अनेक ब्राह्मणांनी त्याकाळी मदत केली होती. आज महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामी केली जातेय. महिलांविषयी सार्वजनिक ठिकाणी रामदेवबाबा अशी विधाने करतात. हे बोलण्याचं धाडस कुठून येते? आमच्या महापुरुषांना नावं ठेवायची असं सांगत भुजबळ यांनी रामदेव बाबांच्या विधानाचा समाचार घेतला.
तसेच ६ डिसेंबरला मुंबईला यायला सांगावं लागत नाही. १०-१५ लाख लोक उन्हातान्हात उभे राहतात. रायगडावर जायला कुणाला सांगावं लागत नाही. लाखो जण तिथे जातात. पण महात्मा फुलेंबाबत असं काही घडत नाही. लोकांचा रेटा लावावा लागतो. लाखो अनुयायी आहेत पण पुढे कोण येत नाही. आमच्या भगिनींना सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षण मिळालं. पहिल्या शाळेत ६ मुली होत्या. त्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष गायला २५-५० हजार महिला सामुहिक वाचन करायला येतात. पण सावित्रीबाईंनी जिथं पहिली शाळा उभारली तिथे जाऊन क्षणभर मस्तक ठेवावं असं कुणालाही वाटत नाही. दोऱ्यावाली सावित्री नवऱ्याला विचारत नाही ७ जन्म राहणार की नाही. न विचारताच बांधत असतात अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार
गेल्या अनेक वर्षापासून मी मागणी करतोय. आज महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या गेटवर जिथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे. तिथेच आज महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं तैलचित्र प्रतिमा लावल्या. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो. महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबत कुठलीही मागणी केली तरी ती सहजासहजी मिळत नाही. आपोआप तर होतच नाही. कुठलाही पक्ष असला तरी फुले, आंबेडकर आणि शाहू विचारांचा वारसा चालवणाऱ्या राजकीय नेत्यांची वाणवा सगळीकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावतो, बाबासाहेबांची प्रतिमा लावतो कुणालाही सांगावं लागत नाही. पण पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले नाव देताना अनेक अडचणी आल्या असंही भुजबळ म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"