एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देणार? बावनकुळेंनी मांडले शक्तीचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 03:57 PM2023-03-29T15:57:33+5:302023-03-29T15:58:32+5:30
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचेही उदाहरण दिले आहे. लोकमतला बावनकुळेंनी प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे, असेही सांगितले.
शिंदेंच्या शिवसेनेला विधानसभा, लोकसभेला जागा वाटपावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. याला बावनकुळेंनी काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. तसेच जागावाटपावेळी काय केले जाणार आहे, त्यापूर्वी कोणती तयारी केली जात आहे, हे स्पष्ट केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचेही उदाहरण दिले आहे. लोकमतला बावनकुळेंनी प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे, असेही सांगितले.
जागावाटपाबाबत खुलासा करताना बावनकुळे म्हणाले की, शिंदेंकडे ५० आमदार आहेत. भाजपाकडे १०५ आहेत काही अपक्ष आहेत. आपल्याला संपूर्ण शेअर करावे लागेल. २४०-५०-६०-७० असे जेवढी ताकद आपली वाढविता येईल तेवढी वाढवावी लागेल, असे मी प्रवक्ता बैठकीत म्हणालो होतो. हे कोणाकरता कामाला येणार, जेवढी भाजपा मेहनत करेल, उद्या १०० जागा किंवा १२० जागा आल्या व शिंदेंना सव्वाशे, दीडशे गेल्या तर भाजपा विचार करतेय की जेवढी भाजपाच्या उमेदवारांना ताकद लागेल, तेवढी क्षमता ताकद उद्या शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभेला आम्ही देणार आहोत. एकनाथ शिंदेंची जिथे ताकद आहे आणि उमेदवार भाजपाचा असेल तर त्यांनी त्यांची तयारी करू नये का, त्यांची टीम तयार करू नयेत का, अशी भूमिका मी मांडल्याचे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र होतो, तेव्हा आम्ही काय करायचो. तेव्हा २८८ ची तयारी करायचो. २५ युती चालविली. कधी जागा कमीजास्त झाल्या. परंतू आम्ही पूर्ण महाराष्ट्राची तयारी करायचो. शेवटी एकच निवडणुक लढवायची आहे का, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. यामुळे आम्ही शिंदेंसाठी आणि भाजपासाठी तयारी करत आहोत. आमची ताकद आम्ही वाढवतोय. शिंदेंच्या उमेदवारासाठी भाजपाची पूर्ण शक्ती लावणार आहोत, असेही बावनकुळेंनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच...
हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. देवेंद्र फडणवीस आणि ते एकत्र बसून निर्णय करतील. गरजही आहे. एका मंत्र्याकडे दोन दोन तीन तीन जिल्हे आहेत. यामुळे मला असे वाटते मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असेही ते म्हणाले.