आरक्षणामधून निवडलेल्या किती जणींनी महिला अजेंड्यावर प्रश्न मांडले? डॉ. नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:34 PM2019-07-25T12:34:01+5:302019-07-25T12:34:43+5:30
३३ टक्के आरक्षण मिळाल्यामुळे महिलांचे राजकारणात येण्याचे प्रमाण वाढले.
पुणे : स्त्री ही एक अत्यंत प्रभावी मतदार आहे. महिलांना मतदानाचा अधिकार उपकार म्हणून मिळाला नाही, तर समान स्थान देण्यासाठी मिळाला आहे. ३३ टक्के आरक्षण मिळाल्यामुळे महिलांचेराजकारणात येण्याचे प्रमाण वाढले. मात्र आरक्षण फायदा घेऊन निवडुन गेलेल्या किती महिलांनी महिला अजेंड्यावर प्रश्न मांडले, असा प्रश्न विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आयोजित माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी गौरव व्याख्यानमालेत ‘स्त्री आणि राजकारण’ या विषयावर त्या बोलत होत्या. मसापचे प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगुडे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीतराजे पवार यावेळी उपस्थित होते. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, भारतातील स्त्रिया पुढारलेल्या आहेत. हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. राजकारणात हिंसाचार आणि चारित्र्यहनन या सर्वात मोठ्या संकटांना स्त्रियांना सामोरे जावे लागते. प्रत्येक पक्षाने महिलांना गटनेता म्हणून संधी दिली पाहिजे. महापालिकेतील महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद देखील आम्हाला देण्यात यावीत, अशाही मागण्या आता स्त्रियांकडून होऊ लागल्या आहेत. राजकीय तिकिट देताना आपण कामात किती बसतो, यापेक्षा कोणत्या वर्गातून आरक्षण मिळेल याचा विचार केला जातो. आरक्षणाच्या भूमिकेतून राजकीय अपरिहर्यात निर्माण झाली आहे.
राजकारणात काम करणाऱ्या महिलांमध्ये अकरा गुण आवश्यक आहेत. त्यामध्ये पक्षाची उतरंड स्विकारावी, कार्यक्षमता, विश्वास मिळवणे, कामात सातत्य, वाचन व अभ्यास, धाडस, नेतृत्व, धोरणात्मक निर्णयांना कामातून उत्तर, माध्यमांची साथ, इव्हेंट न करता उपयुक्त काम करणे, रस्त्यावर उतरून आपले काम दाखविले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पराकोटीचे स्त्रियांचे शोषण होत असल्याने महिला संघटना निर्माण झाल्या. दलित महिला देखील संघटित होऊन स्थानिक पातळीवर काम करू लागल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर एकत्र आल्या होत्या. त्यातून महिलांची राजकीय जागृता वाढण्यास मदत झाली.
राजकीय पटलावर अनेक पदावर महिला काम करताना पाहून खूप आनंद होतो. पण पतीच सर्व कारभार पाहू लागल्याचे चित्र समोर आल्याने आता तरी स्त्रियांना मुक्त कारभार करण्याची संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षा र्डा. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. राजकारणात हजारमधील चार-पाच महिला सक्रिय राहतात. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्या मागे पडतात. तर काही महिला सामाजिक आणि पक्षीय पातळीवर घर सांभाळून काम करीत असून पक्षातूनच हल्ले करण्याचाही प्रयत्न असतो. पण मला शिवसेनेत असा अनुभव आला नाही. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ग्रामीण भागात प्रश्नांसाठी लढणाऱ्या सामान्य महिला या राजकारणाच्या कणा असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.