प्रत्येक वादामागे तावडेंचे नाव कसे?
By admin | Published: October 1, 2014 02:21 AM2014-10-01T02:21:04+5:302014-10-01T02:21:04+5:30
राज्यातल्या कोणत्याही राजकीय खेळीमागे जसे शरद पवार यांचे नाव घेतले जाते तसेच भाजपामधील दोन मोठय़ा नेत्यांच्या वादावादी, भांडणाच्या मागे विनोद तावडे यांचे नाव घेतले जाते.
Next
>अतुल कुलकर्णी- मुंबई
राज्यातल्या कोणत्याही राजकीय खेळीमागे जसे शरद पवार यांचे नाव घेतले जाते तसेच भाजपामधील दोन मोठय़ा नेत्यांच्या वादावादी, भांडणाच्या मागे विनोद तावडे यांचे नाव घेतले जाते.! हा राजकीय योगायोग असेलही पण तावडेंची कारकिर्द आंदोलनांपेक्षा त्यांच्या मोठमोठय़ा पोस्टर्सनीच गाजत आली आहे हे ही खरेच!
मुंबईत रेसकोर्सवर 1995 साली भाजपाचे महाअधिवेशन झाले होते. अभाविपमध्ये काम करणा:या तावडेंवर प्रमोद महाजनांनी त्यावेळी काही जबाबदा:या दिल्या. त्या यशस्वी पार पाडल्याने तावडेंच्या पक्षातील राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
हशु अडवाणी, राम नाईक, जयवंतीबेन मेहता, प्रेमकुमार शर्मा, रामदास नायक ही मंडळी मुंबईचे राजकारण ढवळून काढत होती. मधु देवळेकर विधानपरिषद गाजवत होते. मुंबईत मराठी अमराठी वादाचा तो काळ होता. भाजपाने मराठी चेहरा द्यावा असा मुद्दा पुढे आला आणि तावडेंनी ‘हाच तो क्षण, हीच ती वेळ’ म्हणत भाजपा मुंबई अध्यक्षपद मिळवले. तावडे अध्यक्ष झाले तेव्हाही मुंबईच्या आर्थिक नाडय़ा महापालिकेतून हलत होत्या. तेथे असलेली आशिष शेलार, पराग अळवणी ही जोडगोळी तावडेंच्या कामी आली. त्यातही शेलार यांचा नगरविकास विभागाचा चांगला अभ्यास. मुंबई अध्यक्षपदावरुन तावडेंनी देखील बिल्डरांचे गैरव्यवहार कसे चालतात याकडे बारीक नजर ठेवली. याचा फायदा त्यांना पुढे विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानंतर झाला.
तावडेंच्या अध्यक्षपदाच्या काळात मुंबईत भाजपा किती वाढला हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे मात्र याच काळात भाजपा शिवसेनेच्या अंकीत आला. तावडेंच्या अध्यक्षपदानंतर त्यांच्या राजकीय प्रगतीचा आलेख जेवढा उंचावला तेवढा मुंबई भाजपाचा उंचावला नाही.
याच काळात प्रकाश मेहता प्रमोद महाजनांच्या अगदी जवळ होते. पक्ष निधीपासून ते पक्ष कार्यार्पयत मेहता महाजनांच्या जवळ असायचे. ज्या पध्दतीची ती जवळीक होती तीच आपल्यालाही साधता आली पाहिजे अशी खूणगाठ तावडेंनी मनाशी बाळगली असणार. अध्यक्षपद मिळाल्यानंतर तावडेंच्या राजकीय इच्छाशक्तीला धुमारे फुटले. त्यातून त्यांनी कोकणात ‘मुख्यमंत्रीपदाचा चेहरा’ अशी मोठमोठी होर्डिग्ज लावली.
बॅनर व होर्डिग्जवर नेता होता येते हे ओळखून मोजक्या शब्दात त्यांची बॅनरबाजी मुंबईतही झळकली. तावडेंचा हा वेग गोपीनाथ मुंडेंसारख्या चाणाक्ष नेत्याने बरोबर ओळखला आणि मुंडेंकडे डाळ शिजत नाही हे लक्षात येताच तावडे गडकरींच्या गोटात गेले. गडकरींनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात तावडेंना वापरुन घेतले की गडकरी-मुंडे वादाचा राजकीय फायदा तावडेंनी घेतला याविषयीची चर्चा आजही पक्षात रंगते. मुंडेंचा विरोध डावलून भाऊसाहेब फुंडकरांना बाजूला करत तावडेंना विरोधीपक्ष नेते पद दिले गेले. पहिल्याच अधिवेशनात नोंदणी, दस्तावेज व डिजीटलायङोशनचे राज्यभराचे काम विशिष्ट व्यक्तींना विनानिविदा दिले जाते असा सनसनाटी आरोप तावडेंनी केला. सिंचन घोटाळ्यावरुन नागपुरात विधीमंडळाचे कामकाज बंद पडलेले असताना व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण न्यायीय चौकशीसाठी मनाची तयारी करत असताना परिषदेचे कामकाज काही काळ चालले आणि सुनील तटकरेंनी त्यात टास्क फोर्सची घोषणाही करुन टाकली. त्यामुळे आंदोलन करणारे विरोधकच हतबल झाल्याचे नागपूरने पाहिले.
काही महिन्यापूर्वी राज्य वीज मंडळात 7क् हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप पत्रकारपरिषदेत तावडेंनी केला. या घोटाळ्यांची कागदपत्रे त्यांनी ऊर्जामंत्री अजित पवार यांना मंत्रलयात भेटून दिली. मात्र त्याचे पुढे काय झाले हे आजर्पयत समोर आले नाही. युतीच्या फुटीचे खापर तावडेंवरच फोडले जाते. त्यामुळे त्यांना पराभूत करण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे.
विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तावडेंनी मुख्यमंत्रीपदासाठी उडी घेतली. मात्र नितीन गडकरी, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस अशी मोठी फळी आपल्या पुढे आहे हे कळताच तावडेंनी पंकजा मुंडे यांच्या निर्धार यात्रेत पंकजाचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणून ठेवले.
त्यावरुन पक्षात तीव्र नाराजीची लहर उमटली आणि पंकजानीच तावडेंचा हा विनोद होता असे सांगून त्यावर पडदा टाकला. एकेकाळी गडकरींच्या जवळ गेलेल्या तावडेंनी पंकजा मुंडेंच्या निर्धार यात्रेत त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करुन पंकजाची पाठराखण केली की राजकीय अडचणी वाढवल्या हे मुंडेंवर प्रेम करणा:यांना कळून चुकले असेल.