दोन दिवसांत कर्ज फेडायचे कसे?
By admin | Published: June 30, 2017 01:22 AM2017-06-30T01:22:02+5:302017-06-30T01:22:02+5:30
शेतकऱ्यांनी २०१६-१७मध्ये घेतलेल्या कर्जाची शुक्रवार, ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत:
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांनी २०१६-१७मध्ये घेतलेल्या कर्जाची शुक्रवार, ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने शुक्रवारपर्यंत एकदम पैसा भरायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
३० जूनची मुदत वाढवून, किमान १५ जुलैपर्यंत तरी करावी, अशी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या मुदतवाढीचा निर्णय सहकार विभागाने गुरुवार सायंकाळपर्यंत घेतलेला नव्हता. मुदतीच्या शेवटच्या दिवशी (३० जून) किती शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड केली जाते, याचा अभ्यास करून मुदतवाढ देण्याबाबतचा विचार केला जाईल, असे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कर्जमाफीचा शासकीय निर्णय २८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला अन् ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली. एवढा पैसा दोन दिवसांत उभारण्याची शेतकऱ्यांची आर्थिक कुवत नाही.
आधारसंलग्न कर्जमाफी-
या आधी २००९मध्ये दिलेल्या कृषी कर्जमाफीमध्ये अनेक घोटाळे झाले होते. बोगस लाभार्थी दाखवून पैसा उचलण्यात आला. यावेळी कर्जमाफीची रक्कम ही आधार संलग्न करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.
‘अवघ्या ८ हजार कोटींची कर्जमाफी’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. कर्जमाफीसंदर्भात खाटे आकडे, जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या परिघाबाहेर फेकले गेले आहेत. कर्जमाफीसाठीच्या अटी व कालावधी पाहता प्रत्यक्षात अवघ्या ८ हजार कोटींचीच कर्जमाफी असल्याचा दावा काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.