महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास कितपत सुरक्षित?
By नितीन जगताप | Published: June 11, 2023 10:11 AM2023-06-11T10:11:12+5:302023-06-11T10:12:24+5:30
ओडिशात झालेल्या अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीचा ऊहापोह.
नितीन जगताप, प्रतिनिधी
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी रेल्वेसेवा म्हणून ओळखली जाते. खंडप्राय देशाला जोडणाऱ्या भारतीय रेल्वेचे अप्रूप सर्वांनाच आहे. मात्र, ओडिशात नुकत्याच झालेल्या अपघातामुळे रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेवर ओरखडा निर्माण झाला आहे. रेल्वेच्या इतिहासात अपघात झालेच नाहीत असे नाही परंतु, प्रत्येक अपघाताची कारणे वेगवेगळी होती. कधी त्यात मानवी चुका उघडकीस आल्या, तर कधी तांत्रिक चुकांमुळे अपघात घडले. रुळांवरून डबे घसरणे ही तर नित्याचीच बाब झाली आहे. महाराष्ट्रातही रेल्वेचे किरकोळ अपघात कुठे ना कुठे घडतच असतात. गेल्या वर्षी राज्यभरात १४६.५ कोटी लोकांनी रेल्वे प्रवास केला. यामध्ये लोकलच्या १३१ कोटी लोकांचा समावेश आहे. रेल्वे प्रवासासोबत मालवाहतुकीचेही महत्त्वाचे साधन आहे. असे असतानाही ही महाकाय यंत्रणा तंदुरुस्त आणि सुरक्षित करण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने अनेकदा रेल्वे अपघातही झाले आहेत.
सुरक्षा ‘कवच’ नाहीच
महाराष्ट्रात मध्य रेल्वेच्या ३६५ मेल एक्स्प्रेस व ६०० ते ७०० मालगाड्या कवचाविनाच धावत आहेत. महाराष्ट्रात कोकणशिवाय अन्यत्र कोठेही कवच प्रणाली वापरात नाही. देशभरातील ६८ हजार किलोमीटर रेल्वे मार्गांपैकी अवघ्या १२०० किलोमीटर मार्गावरच ती बसवली आहे. दोन रेल्वे एकाच मार्गावर येतात, तेव्हा दीड किलोमीटर दूर अंतरावर इंजिनमधील अलार्म वाजू लागतो. त्यानंतर ब्रेकिंग यंत्रणा कार्यान्वित होत रेल्वे सुरक्षित अंतरावर रोखल्या जातात.
इंटरलॉकिंगचे काय?
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने सध्या तरी इंटरलॉकिंग प्रणालीवर भरवसा ठेवला आहे. गाडी कोणत्या लाइनवर घ्यायची याचा निर्णय होताच, त्यानुसार लोहमार्ग हलवला जातो. एका मार्गावरून धावणारी गाडी मुख्य लोहमार्गावर घ्यायची असेल, तेव्हा दोन्ही लोहमार्ग परस्परांना जोडले जातात. ते पूर्णत: जोडले गेल्यावरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होते. महाराष्ट्रभरात सर्वत्र ही प्रणाली बसवण्यात आली आहे.
एडब्ल्यूएस प्रणालीमुळे रेल्वेचा वेग, रेल्वे टक्कर, रेल्वे डबे घसरण्याच्या घटनांना रोखण्यात मुंबई विभागाला यश आले आहे. ही प्रणाली दर ५०-१०० मीटरवर कार्यान्वित आहे. हे एक चुंबक असून ते सिग्नलशी जोडले आहे. अपघात रोखण्यात ही प्रणाली यशस्वी ठरली आहे. - शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.