....यांना ‘जाणता राजा’ कसं म्हणायचं - विनोद तावडे
By admin | Published: June 26, 2016 09:24 PM2016-06-26T21:24:13+5:302016-06-26T21:24:13+5:30
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी एका जाहीर समारंभात तडाखेबंद उत्तर दिले.
Next
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ - राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी एका जाहीर समारंभात तडाखेबंद उत्तर दिले. इतिहासातील दाखला देतानाच, ‘यांना जाणता राजा तरी कसं म्हणायचं?’ असा सवालही त्यांनी उपस्थित करताच सभागृहातील उपस्थितांनी हसून दाद दिली.
शाहू पुरस्कार स्वीकारण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण सांगताना, छत्रपतींच्या काळात छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत. त्यानंतर पेशवे फडणीसांची नेमणूक करत असत; पण इतिहासात प्रथमच मी फडणवीसांनी छत्रपतींची नेमणूक केल्याचे पाहिले, अशा शब्दांत शरद पवार यांनी टीकेचे आसूड ओढले होते.
पवार यांच्या या टीकेला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी शाहू गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात जोरदार उत्तर दिले. या सोहळ्यात श्रीमंत शाहू महाराज यांनी त्यांच्या भाषणात फडणवीस सरकार शाहूंचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आवजरून सांगितले. शाहू महाराजांनी बहुजन विकासासाठी काम केले, त्याच पद्धतीने राज्यातील व केंद्रातील सरकार काम करताना दिसत आहे. शाहूंच्या विचारांचे कार्य आणि वारसा लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी संभाजीराजेंना खासदार म्हणून नियुक्त केले, असा कृतज्ञापूर्वक उल्लेख शाहू महाराजांनी केला.
याच भाषणाचा संदर्भ देत शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, हाच मुद्दा काल (शनिवारी) दुपारी तुमच्या वाडय़ावर जेवायला आलेल्या पाहुण्यांना (शरद पवार) सांगितला असता तर संध्याकाळी त्यांच्याकडून नको ती टीका झाली नसती. पूर्वी छत्रपतींच्या काळात जावळीच्या मो-यांना, डफळ्यांना आणि सुप्याच्या मोहित्यांना छत्रपतींचं कधी चांगलं दिसलंच नाही. त्याचीच पुनरावृत्ती काल येथे झाली. कोल्हापूरच्या छत्रपतींचं त्यांना चांगलं काही दिसलंच नाही.
मोदी सरकारनं दिल्लीच्या तख्तावर सन्मानानं संभाजीराजेंची राष्ट्रपतींकडून नियुक्ती केली. या गोष्टीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला पाहिजे होते. परंतु त्यांना चांगलं काही दिसलंच नसल्याची टीका केली. मग यांना जाणता राजा कसं म्हणायचं? असा सवाल उपस्थित केला.