महाराष्ट्राला पुरोगामी राज्य कसे म्हणायचे?----थेट संवाद
By admin | Published: October 17, 2014 09:49 PM2014-10-17T21:49:57+5:302014-10-17T22:17:02+5:30
डॉ. हमीद दाभोलकर यांचे मत
जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला असला, तरी अद्यापही अघोरी प्रकारात घट का झालेली नाही?
- सर्व धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा नष्ट व्हाव्यात, या हेतूनेच जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्यात आला आहे. यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्राणाचे बलिदान दिलेले आहे. अघोरी म्हणजे नरबळीसारख्या घटना अजूनही होत आहेत, हे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. परंतु या कायद्यामुळे ९० हून अधिक तक्रारी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. हळूहळू नागरिकांत जागृती होत आहे. यामागे कायद्याचे पाठबळ आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. केवळ कायदा करुन कोणतेच प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असते. अंनिसतर्फे जागृतीचे कार्य अव्याहत सुरु असून, भविष्यकाळात निश्चितपणे अघोरी प्रकारात घट झालेली पाहावयास मिळेल.
कायदा झाला असला, तरी तो जनतेपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचला नाही, असे वाटते का?
- हो, बरोबर आहे. शासनाने कायदा सामान्य जनतेपर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते. शासकीय प्रचार यंत्रणेमार्फत कायद्याचा प्रचार करणे, पोलिसांसाठी प्रशिक्षण शिबिर घेणे आदींना महत्त्व दिले असते, तर नागरिक जागरुक झाले असते आणि तक्रारींचा ओघ वाढला असता.
कायद्याची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अंनिसतर्फे कोणते उपक्रम राबविले?
- आम्ही आमच्यापरीने पूर्ण प्रयत्न केले आहेत. नुकतीच फेब्रुवारी ते मे २०१४ या कालावधित राज्यातील ३५ जिल्ह्यांतून ‘प्रबोधन यात्रा’ काढण्यात आली होती. ८५ दिवस चाललेल्या या यात्रेमध्ये कायद्याची माहिती होण्यासाठी २२५ कार्यक्रम कार्यकर्त्यांनी सादर केले. त्याला सर्वत्रच चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे कायदा काय आहे? तक्रार कशी नोंदवावी? यासाठी अंनिसतर्फे राज्यात एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात आले आहे. लवकरच नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाईनची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. जादूटोणा विरोधी कायदा राज्यापुरता मर्यादित न राहता देशपातळीवरही लागू व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
विशिष्ट धर्मियांनाच लक्ष्य करण्याकरिता अंनिसतर्फे कायद्याचा आग्रह धरण्यात आला, या आरोपात कितपत तथ्य आहे?
- यात अजिबात तथ्य नाही. कायदा हा सर्वांना समान असतो, हे आरोप करणाऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. या कायद्याअंतर्गत जे गुन्हे दाखल केले आहेत, त्यामध्ये सर्व धर्मातील भोंदू लोकांचा समावेश आहे. परंतु सातत्याने धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न डॉक्टरांच्या काळापासून काही संघटना आणि संस्थांचा आहे. परंतु आता वास्तव जनतेसमोर आले आहे. यामुळेच आमचे कार्य दुप्पट जोमाने सुरु आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील आरोपी अद्यापही जेरबंद होत नाहीत, हे राज्यकर्त्यांचे अपयश आहे का?
- हल्लेखोराने ज्या गोळ्या झाडल्या, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकर या व्यक्तीवर नव्हत्या, तर प्रश्न विचारणाऱ्या संस्कृतीवरच तो हल्ला होता, हे कधीही विसरता कामा नये. एका सामाजिक कार्यकर्त्याचा खून होतो आणि वर्षानंतरदेखील आरोपी मोकाट असतात, याला काय म्हणायचे? राज्य सरकारचे पोलीस खाते अपयशी ठरले म्हणून तपास सी. बी. आय. कडे सोपविला; परंतु दुर्दैवाने तेथेही शांतताच आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत अंनिसतर्फे अहिंसात्मक रितीने आंदोलन करण्यात येणार आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्त्यांना उज्ज्वल भविष्यकाळ आहे का?
- ज्या राज्यात सर्वाधिक हत्या या सामाजिक कार्यकर्त्यांच्या होतात, जेथे नरबळींच्या प्रकारात वाढ होते, डॉक्टरांच्या आरोपींना अद्याप अटक करण्यात येत नाही, त्याला ‘पुरोगामी’ म्हणायचे का? याचा विचार करण्याची गरज आहे. केवळ शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतले म्हणजे राज्य पुरोगामी होत नाही. राज्यकर्त्यांची वर्तणूक त्याला साजेशी असावी लागते. पितृपंधरवड्यात जे राज्यकर्ते निवडणुकीचे अर्ज भरत नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? कितीही विरोध झाला तरी, कार्यकर्त्यांचे कार्य थांबणार नाही. मात्र निष्क्रिय राज्यकर्त्यांवरील राग निश्चित प्रकट होईल.
४नरेंद्र रानडे
डॉ. हमीद दाभोलकर यांचे मत
अंधश्रध्दा निर्मूलन समिती म्हणजे अखंड सुरु असलेला विवेकाचा जागर! समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांना मूठमाती मिळावी, यासाठी कार्यरत असणारी संघटना... चळवळीचे कार्य खंडित व्हावे, या हेतूने अज्ञात मारेकऱ्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा निर्घृण खून केला. परंतु कार्य थांबलेले नाही, उलट विचार कधीच मरत नाहीत, या तत्त्वावर संघटनेचे कार्य अधिकाधिक विस्तारत आहे. देशस्तरावर जादूटोणाविरोधी कायदा संमत व्हावा, यासाठी अंनिस प्रयत्नशील आहे. संघटनेचे सरचिटणीस आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे सुपुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...