‘कशी असावी पनवेल महानगरपालिका’
By Admin | Published: June 10, 2016 02:44 AM2016-06-10T02:44:09+5:302016-06-10T02:44:09+5:30
पनवेल महानगरपालिका स्थापन करण्याच्या दृष्टीने सरकारने अधिसूचना जारी केली आहे.
पनवेल : पनवेल महानगरपालिका स्थापन करण्याच्या दृष्टीने सरकारने अधिसूचना जारी केली आहे. रायगड जिल्ह्यातील ही पहिली महानगरपालिका असणार आहे. महानगरपालिका कशी असावी, ऐतिहासिक-भौगोलिक विचार, राजकीय दृष्टिकोन, महापालिका झाल्यावर सर्वसामान्यांवर वाढणारा कराचा बोजा, मिळणाऱ्या सोयी-सुविधा आदींबाबत या कार्यक्रमात चर्चा करण्यात येणार आहे.
चर्चासत्रासाठी सिटीझन युनिटी फोरम व केएलई संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कळंबोली यांनी पुढाकार घेतला आहे. शनिवार, ११ जून रोजी सकाळी १०.३० वाजता कळंबोली येथील केएलई महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. चर्चासत्राचे माध्यम प्रायोजक लोकमत आहे.
सिडकोच्या या भागात मेट्रो, बीकेसीसारखे वाणिज्य संकुल, ५५ हजार गृहनिर्मिती करण्याचा मानस आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे पनवेल महानगरपालिकेला वेगळे स्वरूप प्राप्त होणार आहे. नागरिकांना देखील या चर्चेत सहभाग घेता येणार असून आपल्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका कशी असावी, यासंदर्भात प्रश्न नागरिकांना विचारता येणार आहेत. या चर्चेसाठी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, नगरविकास खात्याचे अप्पर सचिव अमित कवडे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे, शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण, शेकापचे बाळाराम पाटील, आरपीआयचे जगदीश गायकवाड, काँग्रेसचे महेंद्र घरत, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
>विकासाची प्रतीक्षा
पनवेल महानगरपालिकेत सिडकोचे खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा पाचनंद आणि नावडे हे विकसित आणि अविकसित नोड, नैना क्षेत्रातील ३६ गावे आणि सिडको क्षेत्रातील २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सिडको नोडमधील खारघर, नैना आणि एसईझेड ही सर्व क्षेत्र विकसनशील असून सिडको व नवी मुंबई एसईझेडअंतर्गत विकास होत आहे.