कोरोनाबाधित आमदारांचे मतदान कसे घ्यायचे? निवडणूक आयोगाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:25 AM2022-06-07T07:25:20+5:302022-06-07T07:25:44+5:30
rajya sabha election 2022 : या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत मतदार असलेल्या आमदारांची मतदान प्रक्रिया कशी पार पाडायची, याबाबत महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारणा केली आहे.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजजकीय घडामोडींना भलत्याच वेग आला आहे. त्याचवेळी कोरोना संसर्गाचेही प्रमाण वाढले आहे. राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत मतदार असलेल्या आमदारांची मतदान प्रक्रिया कशी पार पाडायची, याबाबत महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारणा केली आहे.
दहा जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदार असणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने यापुर्वीच मार्गदर्शक सूचना आणि विहित कार्यपद्धती विशद केली. मात्र, एखाद्या आमदारास कोरोनाची लागण झाल्यास त्याची मतदान प्रक्रीया कशी पार पाडावी, याबाबत स्पष्टता नाही.
त्यामुळे कोरोना बाधित आमदारांचे मतदान कसे घ्यावे, याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकारी राजेंद्र भागवत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदान दिवशी नेमकी काय करावे, कोणत्या सूचना असतील अशी विचारणा या पत्रातून करण्यात आली आहे.