आर्थिक मदत वाटपाचे शिवधनुष्य सरकार कसे पेलणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 09:01 AM2021-08-09T09:01:29+5:302021-08-09T09:01:51+5:30
महापुरात नागरिक, व्यावसायिकांचे दस्तऐवज गहाळ
- आविष्कार देसाई
रायगड : महाडमधील पूर परिस्थितीचे पंचनामे पूर्ण करण्याचे साेपस्कार जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले आहेत. मात्र आता सर्वसामान्य महाडकरांना प्रतीक्षा आहे, ती नुकसानभरपाईची. बहुतांश नागरिकांची विविध महत्त्वाची कागदपत्रे, पुरावे, एटीएम कार्ड असे दस्तऐवज खराब झाले आहेत, तर काहींचे पुरात वाहून गेले आहेत. त्यामुळे बँक खात्यांमध्ये आर्थिक मदत जमा करताना याेग्य लाभार्थ्यांची निवड करण्याचे शिवधनुष्य सरकार आणि प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
२२ आणि २३ जुलै राेजी आलेल्या महापुराने कधी नव्हे तेवढे आर्थिक नुकसान केले आहे. घरांमध्ये, दुकानांमध्ये, रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले. येथील स्वच्छता करण्यासाठी लाखाे हात पुढे आले आहेत. पुराचे पाणी सुमारे १५ फुटांपर्यंत असल्याने घरातील सर्व वस्तू, टीव्ही, फ्रीज, संगणक, लॅपटाॅप, माेबाइल, राेख रक्कम, साेफा, भांडी, महत्त्वाची कागदपत्रे, बँक पासबुक, एटीएम यासह अन्य नुकसान झाले आहे. तसेच व्यावसायिकांचा सर्व माल भिजून मातीमाेल झाला आहे. सरकारी कार्यालये, बँका, न्यायालय अशा सर्व यंत्रणांची कागदपत्रे भिजून खराब झाली आहेत. सुमारे एक काेटी रुपयांच्या चलनी नाेटाही भिजल्या आहेत.
विमा कंपन्यांकडून तांत्रिक मुद्यांवर बाेट
काहींनी विमा काढलेला आहे, मात्र विमा काढण्याआधी मधाळ बाेलणाऱ्या याच कंपन्या आता आपल्या ग्राहकांवर डाेळे वटारत आहेत. विमा कंपन्या मात्र तांत्रिक मुद्यांवर बाेट ठेवत असल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
आर्थिक अफरातफर होण्याचा धोका
सरकार जी आर्थिक मदत करते ती लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याची अलीकडे पद्धत आहे. त्यामुळे या वेळी प्रचंड अडचण निर्माण हाेणार आहे. थेट लाभार्थ्यांच्या हातात मदत टेकवायची झाल्यास आर्थिक अफरातफर हाेण्याचाही धाेका आहे.
मदत वाटपाचे व्यवस्थापन ठरतेय कुचकामी
सुरुवातीला अन्न-धान्य, पिण्याचे पाणी यासह अन्य मदतीचा ओघ महाडकडे आला हाेता. परंतु मदत घेऊन येणारी वाहने वाटेतच अडवून रिकामी केली जात हाेती. मदत घेऊन येणारेदेखील या प्रकारामुळे चक्रावून गेले हाेते. मदत वाटपाचे व्यवस्थापन यामुळे कुचकामी तर ठरले नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.