मतांसाठी ‘हार्दिक’ लाचारी मराठी मनाला कशी पटेल?

By Admin | Published: February 10, 2017 05:33 AM2017-02-10T05:33:21+5:302017-02-10T05:33:21+5:30

भारतीय जनता पार्टीला ‘कोमा’त पाठविण्याचा चंग बांधल्यानंतर शिवसेनेने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोचकारण्यासाठी आणि गुजराती मतांसाठी उचललेला ‘हार्दिक’विडा रंगण्याऐवजी

How will the 'hearty' helpless Marathi Mana be able to vote for votes? | मतांसाठी ‘हार्दिक’ लाचारी मराठी मनाला कशी पटेल?

मतांसाठी ‘हार्दिक’ लाचारी मराठी मनाला कशी पटेल?

googlenewsNext

दिनकर रायकर

मुंबई, दि. 10 - भारतीय जनता पार्टीला ‘कोमा’त पाठविण्याचा चंग बांधल्यानंतर शिवसेनेने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोचकारण्यासाठी आणि गुजराती मतांसाठी उचललेला ‘हार्दिक’विडा रंगण्याऐवजी मराठी जनमनाच्या रंगाचा बेरंग करू पाहत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना ही ‘हार्दिक’खेळी पटली असती का, असा सवाल खंद्या शिवसैनिकांनाही पडला आहे. ठाकरी भाषेत सांगायचे तर ‘हे मराठी मनाला कसे पटेल’, हा सवाल त्यांना पडू लागला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचा वारसाच पुढे चालवत असल्याचे शिवसैनिक अभिमानाने सांगतात. पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाशी असलेले संबंध कडवट झाल्यावर उद्धव यांनी हार्दिक पटेलचे ज्या पद्धतीने स्वागत केले त्याने इतिहास जागविला आहे. तितकीच विसंगतीची जाणीवही. याच मुंबईत भूमिपुत्रांच्या हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना पाळेमुळे घट्ट करू पाहत होती, त्या काळात मराठी अस्मितेसाठी बाळासाहेबांनी मराठीद्वेष्ट्या दाक्षिणात्यांचा आणि गुजराती नेत्यांचा यथेच्छ समाचार घेतला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू पाहणारे मोरारजी देसाई हे बाळासाहेबांचे सुरुवातीचे लक्ष्य होते. कालांतराने इतर राजकीय पक्षांनी मुंबईची धुरा गुजराती नेत्यांवर सोपविल्यानंतर बाळासाहेबांनी केलेली मार्मिक टीका कमालीची गाजली होती. ‘काँग्रेस’चे रजनी पटेल, ‘जनता’चे शांती पटेल, हे मराठी मनाला कसे पटेल? या त्यांच्या घोषणेने शिवसैनिकांना नवी ऊर्जा दिली होती.

आता याच शिवसेनेने सात गुजराती उमेदवार रिंगणात उतरविले आहेत! बाळासाहेबांना कोणाचाच अनुनय मान्य नव्हता. त्यांनी तो केलाही नाही. पण त्यांचा वारसा चालविणाऱ्या नेतृत्वाने गुजरातेत आरक्षणासाठी लढा पुकारलेल्या हार्दिक पटेलचे केलेले स्वागत ही मूळ भूमिकेशी केलेली प्रतारणा नाही का? बाळासाहेबांना जाती-पातीचे आरक्षण कधीच मान्य नव्हते. त्यांनी कायम आरक्षणविरोधी भूमिका घेतली. आता मात्र पटेलांच्या आरक्षणासाठी गुजरातेत वडवानल पेटवू पाहणारा हार्दिक हा मोदींचा कडवा विरोधक आहे, म्हणून शिवसेनेने जवळ केला. तो गुजरात विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचा चेहराही असणार आहे. बाळासाहेबांच्या हयातीत आसेतु हिमाचल शिवसेनेचा चेहरा एक व एकच राहिला. पन्नाशीतील शिवसेनेने पंचविशीतील हार्दिकला आपला चेहरा बनवावे, ही वैचारिक प्रतारणा नाही का?

बाळासाहेब असताना मुंबईत हार्दिकचे असे स्वागत झाले असते तर त्यांनी कुंचल्याचे बोचरे फटकारेच मारले असते. हार्दिकच्या आरक्षणाच्या राजकारणाला विरोध असणाऱ्या मोठ्या गुजराती वर्गाचा शिवसेनेने विचार केला नाही. गुजराती मतांसाठी मराठी जनमन दुखावेल, याची पर्वा शिवसेनेने केलेली दिसत नाही. रिझर्व्ह बँकेपासून रेल्वेच्या मुख्यालयापर्यंत बऱ्याच गोष्टी गुजरातेत हलविण्याचा घाट असल्याचा आरोप मोदींवर करणाऱ्या उद्धव व शिवसेनेला बुलेट ट्रेन गुजरातेतच का जाणार, असाही प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिकला आपला चेहरा बनवून गुजरातकडे कूच करण्याची कृती मराठी मनाला कशी पटेल, हा प्रश्न शिवसेनेच्या गावीही नसेल?

Web Title: How will the 'hearty' helpless Marathi Mana be able to vote for votes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.