राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये पोलीस भरती कशी पार पडणार? विद्यार्थी,पालक संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 07:06 PM2020-07-24T19:06:00+5:302020-07-24T19:07:55+5:30
राज्याच्या गृहमंत्र्यांनी येत्या डिसेंबर अखेर जवळपास १२ हजार ५३८ पदांची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे.
प्रशांत ननवरे
बारामती : राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. शासनाने या काळात संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, याच दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या डिसेंबर अखेर महाराष्ट्रात जवळपास १२ हजार ५३८ पदांची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. आता वाढत्या कोरोना संसर्गाच्या वातावरणात पोलीस भरती प्रक्रिया नेमकी पार कशी पडणार,याबाबत विद्यार्थी आणि पालक वर्गात संभ्रम आहे.
मंत्रालयात गृह विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या प्रमाणात पोलीस भरती जाहीर झाल्यामुळे व त्याचा कालावधी खूप कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील मुले ,मुली पोलीस भरतीच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०१९मध्ये पोलीस शिपाई भरती, पोलीस वाहन चालक भरती व राज्य राखीव पोलीस दल भरतीच्या एकूण ५ हजार २९७ पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरलेलेआहेत. यात नव्याने पदांची वाढ झाल्यामुळे एका बाजुला उमेदवार व पालक यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसऱ्या बाजुला ही भरतीप्रक्रिया कशी राबवली जाईल?, याबाबत प्रचंड संभ्रम आहे.
वास्तविक १८ जानेवारी २०१९ रोजी गृह विभागाने काढलेल्या शासन आदेशानुसार सुरुवातीला १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे . ही लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन घेतली जाणार आहे. या लेखी परीक्षेत पात्र होणाऱ्या उमेदवारांमधून एकास दहाप्रमाणात उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. यामधील मैदानी चाचणी १०० गुणांवरून ५० गुणांची करण्यात आली आहे.यामध्ये मुलांसाठी १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक या तीन प्रकारांचा समावेश आहे, तर मुलींसाठी ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक या तीनप्रकारांचा समावेश आहे. या शासन निर्णयाला पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांनी प्रचंड विरोध केला. लेखी परीक्षा ही ऑफलाईन झाली पाहिजे तसेच मैदानी चाचणी ही १०० गुणांची झाली पाहिजे,अशा मागण्यांची निवेदने संबंधित लोकप्रतिनिधींना व शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली.
याबाबत बारामती येथील सह्याद्री करिअर अॅकडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, एवढ्या मोठ्या जागांची भरती जाहीर केल्याबद्दल शासनाचे सर्व विद्यार्थी आभार व्यक्त करत आहेत. पण ही भरती प्रक्रिया नेमकी कशी राबवणार? हे सरकारने अगोदर परिपत्रक काढून जाहीर करावे, तसेच कोरोना महामारीच्या काळात ही भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने मैदानावर सराव करावा तर पोलीस प्रतिबंध करतात आणि अभ्यासिकेत अभ्यास करावा तर महाराष्ट्रातील सर्व अभ्यासिका कोरोनामुळे बंद आहेत . त्यातच पोलीस भरती येत्या डिसेंबरच्या आत सरकारने जाहीर केल्याने खूप कमी कालावधी उमेदवारांच्या हातामध्ये शिल्लक राहिला आहे.