कसा राहणार पोलिसांवर भरोसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2017 08:59 PM2017-06-29T20:59:24+5:302017-06-29T20:59:24+5:30

मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते.

How will the police trust? | कसा राहणार पोलिसांवर भरोसा ?

कसा राहणार पोलिसांवर भरोसा ?

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते. गेल्या काही काळापासून ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र तरीदेखील पोलीस प्रशासनाने यातून बहुतेक धडा घेतलेला नाही. म्हणूनच की काय भरोसा सेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी अवघ्या तीन जणांचा स्टाफकार्यरत आहे. विशेष म्हणजे शहरात लाखो ज्येष्ठ नागरिक असताना मागील सव्वापाच वर्षांत केवळ साडेतीन हजारांच्या आसपासच नागरिकांचे कार्ड तयार करण्यात आले आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडे विचारणा केली होती. भरोसा सेलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले कार्ड तसेच दामिनी पथकाला देण्यात आलेल्या सुविधा इत्यादींबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी भरोसा सेलमध्ये केवळ एक अधिकारी व दोन कर्मचारी कार्यरत आहेत. भरोसा सेलतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विशेष कार्ड देण्यात येते. १ जानेवारी २०१२ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत पोलीस विभागातर्फे केवळ ३,६६२ ज्येष्ठ नागरिक कार्ड वितरित करण्यात आले. तर या कालावधीत केवळ ३७२ नागरिकांना प्रत्यक्ष मदत देण्यात आली. मागील पाच वर्षात चक्क ३८ ज्येष्ठ नागरिकांची हत्या करण्यात आली. तर फसवणूक व मारहाणीचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल, असा दावा अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला होता.अशा स्थितीत माहितीच्या अधिकारातील ही आकडेवारी पोलिसांच्या दाव्यांची पोलखोल करणारीच आहे.

दामिनी पथकासाठी केवळ चार गाड्या

महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांमध्ये २०११ पासून विशेष पथक कार्यरत आहे. २०१६ साली याला दामिनी पथक असे नाव देण्यात आले. शहरात छेडखानी, महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने होत असतात. अशा घटना थांबविण्याची जबाबदारी दामिनी पथकावर आहे. हे पथक शहरभरात सातत्याने फिरतीवर राहणे अपेक्षित आहे. मात्र या पथकाकडे केवळ चार वाहने असून प्रत्येक गाडीवर चार व एका गाडीवर तीन असे केवळ १५ कर्मचारी याअंतर्गत कार्यरत आहे. १ जानेवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत महिला व तरुणींची छेडखानी करणाऱ्या १,३५९ जणांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: How will the police trust?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.