'तुमची ताकद किती समजून जाईल'; गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचा संदीप नाईकांना सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 09:19 AM2024-11-13T09:19:21+5:302024-11-13T09:22:43+5:30
Maharashtra Election 2024: ऐरोलीचे भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नामोल्लेख न करता संदीप नाईकांवर निशाणा साधला.
Devendra Fadnavis Sandeep Naik: गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी बंडखोरी करत भाजपच्या उमेदवाराविरोधातच दंड थोपटले आहे. एकीकडे गणेश नाईक भाजपच्या तिकिटावर लढत असून, संदीप नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. संदीप नाईक यांनी केलेल्या बंडखोरीबद्दल भाष्य करताना देवेंद्र फडणवीसांनी सूचक इशारा दिला.
गणेश नाईक निवडणूक लढवत असलेल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतही बंडखोरी झाली आहे, असे म्हणत संदीप नाईकांवर टीकेची तोफ डागली.
देवेंद्र फडणवीस नक्की काय बोलले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काही प्रमाणात आपल्याही महायुतीत बंडखोरी झालीये. आपल्या नवी मुंबईत तर झालीच झालीये. पण काही अडचण नाहीये. मी कुणाला कमी लेखत नाही, पण मला असं वाटतं की ठीक आहे. तुमची ताकद अजमावून पहा, तुम्ही पत काय आहे, हे तुम्हालाही समजेल.
"बंडखोरांचं तोंड छोटं झालेलं असेल"
"हे जे बंडखोर आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की, तुम्ही तुमची ताकद अजमावून पहा, तुमची ताकद किती आहे, हे समजून जाईल. ज्यादिवशी, २३ तारखेला प्रचंड मतांनी आपली जागा निवडून येईल, त्यादिवशी बंडखोरांचं तोंड देखील छोटं झालेलं असेल. मात्र, आपल्याला त्याकडं लक्ष द्यायचं नाही", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रीत करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून आणायची आहे. मी इथे सभेला आलो नसलो, तरी मी तुम्हाला शब्द देऊन जातो की, विजयी सभेला मी निश्चितपणे येईल. विजयी सभा आपलं सरकार बनवूनच आपण घेऊ", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.