...तरी डॉक्टरांची पदोन्नती रोखणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 08:41 AM2023-03-25T08:41:03+5:302023-03-25T08:41:12+5:30
आमदार सुनील शिंदे यांनी ९३च्या सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला.
मुंबई : मुंबई महापालिका अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक, डीन, सहसंचालक व संचालक यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय प्रशासक म्हणून आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. याचा परिणाम पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्यांवर होत असल्याची बाब आमदार सुनील शिंदे यांनी समोर आणली असता, सेवानिवृत्तीचे वय वाढवले असले तरी त्याचा कोणताही परिणाम पदोन्नतीवर होऊ देणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आमदार शिंदे यांनी ९३च्या सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला. दिल्लीतील एम्ससह अन्य महाविद्यालयात ६० वर्षांनंतर अध्यापक, डीन, संचालक अशी लाभाची पदे ग्रहण न करता डॉक्टर रुग्णसेवा बजावत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयातील डॉक्टरांना ६० वर्षांनंतर सेवानिवृत्तीचे वय वाढवून देताना लाभाचे पद न करता केवळ रुग्णसेवा करण्यासाठी कार्यरत राहण्याची अट शासन घालणार आहे काय, असेही शिंदे यांनी विचारले.