HSC Board Exam English Paper: 'रतन टाटां'मुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना एक गुण मिळणार; जाणून घ्या काय आहे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 07:20 AM2022-03-06T07:20:32+5:302022-03-06T07:20:50+5:30
HSC Board Exam English Paper: इंग्रजीच्या पेपरमध्ये चूक; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये एका गुणाचा चुकीचा प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंडळाच्या लक्षात ही चूक आली आणि हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा एक गुण देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
इंग्रजीच्या पेपरमध्ये चूक असल्याची तक्रार विद्यार्थी, शिक्षकांनी केली. ‘सिम्पल सेन्टेन्स बनवा’ या प्रश्नासाठी देण्यात आलेले वाक्य मुळातच ‘सिम्पल सेन्टेन्स’ असल्याने विद्यार्थी प्रश्न सोडविताना गोंधळून गेले हाेते.
रतन टाटा जे म्हणालेच नाहीत, ते इंग्रजीच्या पेपरमध्ये
साेशल मीडियामध्ये काेणतेही विधान महान व्यक्तिंच्या नावे प्रसारित करण्याचा प्रकार सर्रासपणे हाेताे. मात्र हा प्रकार बाेर्डाच्या परीक्षेतही व्हावा, हे आर्श्चयच. उद्याेगपती रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल हाेणारे एक वाक्य बारावीच्या परीक्षेतही नमूद केल्याने गाेंधळ उडाला. मंडळाच्या नियंत्रण समितीच्या लक्षात ही चुकी का आली नाही, असा सवाल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला.
छपाईमध्ये ही चूक झालेली आहे. ‘तो’ संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना एक गुण देण्यात येणार आहे.
- शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ