HSC Chemistry Paper Leak: बारावीचा 'हा' पेपर फुटला, एका शिक्षकाला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:58 AM2022-03-14T11:58:14+5:302022-03-14T11:59:20+5:30
व्हॉट्सॲप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आल्याचं प्रकरण घडलं आहे. या पेपरफुटीप्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या शिक्षक मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे.
राज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहेत. मुंबईत बारावीचा रसायन शास्त्राचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण मंडळाकडून परीक्षा जबाबदारपणे घेण्यात येत असल्या तरी देखील मुंबईत बारावीचा हा पेपर फुटल्याचा प्रकार घडला आहे.
व्हॉट्सॲप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आल्याचं प्रकरण घडलं आहे. या पेपरफुटीप्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे. विले पार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना हा पेपर आधीच मिळाला होता. आता पेपर व्हायरल करणा-या तीन विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने पुन्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याची चौकशी सुरू आहे. टीईटी, लष्कर भरतीपासून परिक्षांमध्ये घोटाळे झाल्यानंतर आता पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, याचीही माहिती घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.