बारावीचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:53 AM2019-05-05T06:53:41+5:302019-05-05T06:54:00+5:30
अकरावी अभ्यासक्रमापाठोपाठ बारावीचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१) तो लागू केला जाणार आहे.
पुणे : अकरावी अभ्यासक्रमापाठोपाठ बारावीचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२०-२१) तो लागू केला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तज्ज्ञ, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून १० मे २०१९ पर्यंत आॅनलाइन सूचना, शिफारशी मागविण्यात आल्या आहेत. ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर त्या नोंदविता येतील.
महाराष्टÑ राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाची पुनर्रचना व त्यास अनुसरून नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. संचालक डॉ. सुनील मगर यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
उच्च माध्यमिक स्तरावरील विविध विषयांच्या अभ्यासक्रमाची मांडणी ही नव्याने क्षमता विधानांच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे. अकरावीचा विचार करता विषयाचे प्राथमिक ज्ञान अपेक्षित आहे. बारावीसाठी विषयाचे उपयोजनात्मक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे व त्याचा अवलंब करावा हा विचार ठेवण्यात आलेला आहे.
अभ्यासक्रमाची मांडणी ही क्षमता विधानांच्या स्वरूपात निश्चित करण्यात आली असल्याचे बालभारतीने म्हटले आहे. फक्त विषयज्ञानात भर घालण्यापेक्षा त्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने होणाऱ्या क्षमता विकासावर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमांबाबत शिफारशी, सूचना पाठविण्याचे आवाहन बालभारतीकडून करण्यात आले आहे.