बारावीचे परीक्षा अर्ज ‘आॅनलाइन’
By admin | Published: September 30, 2016 02:04 AM2016-09-30T02:04:31+5:302016-09-30T02:04:31+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे आॅनलाईन परीक्षा अर्ज येत्या १ आॅक्टोबरपासून
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे आॅनलाईन परीक्षा अर्ज येत्या १ आॅक्टोबरपासून भरण्यास उपलब्ध होणार आहेत. शासन आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जामध्ये आधारकार्ड क्रमांक भरावा लागणार आहे, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेचे अर्ज आॅनलाईन स्वीकारले जाणार असून विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येतील. परीक्षा अर्ज आॅनलाईन भरण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज भरावेत. बारावीच्या नियमित, पुन्हा परीक्षा देणारे, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. विद्यार्थ्यांना येत्या १ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील तर १८ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल.
राज्य मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीतच विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरून बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावे, असेही कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)