राज्यातही बारावी परीक्षा होणार रद्द, मंत्रिमंडळाचा निर्णय; प्राधिकरणाचा निर्णय उच्च न्यायालयाला कळविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:12 AM2021-06-03T08:12:17+5:302021-06-03T08:12:38+5:30
दहावीची परीक्षा रद्द केली, त्याच निकषावर बारावीचीही परीक्षा रद्द केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले.
मुंबई : राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर हा निर्णय उच्च न्यायालयास कळविण्यात येणार आहे.
परीक्षा रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना परीक्षा घेऊन पाल्य, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य होणार नाही. दहावीची परीक्षा रद्द केली, त्याच निकषावर बारावीचीही परीक्षा रद्द केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले. याबाबत आधी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय होईल आणि तो उच्च न्यायालयास कळविला जाणार आहे.
बारावीच्या परीक्षेबाबतचा शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास पाठविण्यात आला आहे. त्यानुसार प्राधिकरण निर्णय घेईल. केंद्र व राज्य शासनाच्या भूमिकेत एकसूत्रता असावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले होते.
- वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण
काय असेल फॉर्म्युला?
परीक्षा न घेता बारावी परीक्षेचा निकाल कसा लावायचा याचा फॉर्म्युला शिक्षण विभाग निश्चित करेल. इयत्ता नववी, दहावी व अकरावीच्या गुणांची सरासरी काढून निकाल देणे, हा एक पर्याय असला तरी गेल्यावर्षी अकरावीची परीक्षा झालेली नव्हती, ही अडचण आहे. तसेच पदवी प्रवेशासाठी सीईटीच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो.