बारावीचा पहिला पेपर सुरळीत
By admin | Published: March 1, 2017 02:41 AM2017-03-01T02:41:08+5:302017-03-01T02:41:08+5:30
विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली.
नवी मुंबई : विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला असून, मुंबई विभागातील ५५७ केंद्रावर ३ लाख ४० हजार ४०८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे, तर ठाणे जिल्ह्यातील १४८ केंद्रावर ९६ हजार १८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथके व दक्षता समिती नेमण्यात आली असून, यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारऱ्यांचे एक पथक, दुसरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, तिसरे शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य यांचे चौथे पथक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण अधिकारी यांचे पाचवे पथक, तर सहावे महिलांच्या आणि सातवे बोर्डाच्या पथकाचा यात समावेश आहे.
परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रतिबंधित क्षेत्र व या क्षेत्रातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवले होते. इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. परीक्षेच्या अर्धा तास आधीच विद्यार्थ्यांबरोबरच पालकही या ठिकाणी उपस्थित होते. यावर्षी विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने ज्या केंद्रांवर आसन व्यवस्थेत अडचणी आल्या, अशा केंद्रानी शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने शेजारील इमारतीमध्ये बैठक व्यवस्था केली होती. बुधवारी ११ ते २ या वेळेत हिंदीचा पेपर होणार असून १ लाख २४ हजार ६६ विद्यार्थी हिंदीचा पेपर देणार आहेत. विद्यार्थी तसेच पर्यवेक्षक मोबाइल वापरास बंदी करण्यात आल्याने ज्यांच्याकडे मोबाइल फोन आढळले, अशा विद्यार्थ्यांचे फोन जमा करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालकांशिवाय इतरांना मोबाइल फोनचा वापर करण्यास बंदी करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर दिव्यांगाकरिता विशेष सोय करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विशेष कस्टडीत जमा केल्या जाणार आहेत. परीक्षा केंद्राबाहेरील गेटवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार न घडल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. वेळेचे पालन चोखपणे करण्यात आल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)