कॉपीमुक्तीचे सामूहिक धिंडवडे, पाच खोल्यांतील विद्यार्थी बसविले एका हॉलमध्ये, उत्तरांवर टीक मार्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 05:08 IST2025-02-28T05:08:44+5:302025-02-28T05:08:53+5:30
कॉपीच्या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले.

कॉपीमुक्तीचे सामूहिक धिंडवडे, पाच खोल्यांतील विद्यार्थी बसविले एका हॉलमध्ये, उत्तरांवर टीक मार्क
विकास राऊत / राम शिनगारे
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या परीक्षेमध्ये ओहर (जटवाडा) येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात गुरुवारी जीवशास्त्राचा पेपर देणाऱ्या १२५ विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. परीक्षा खोलीला लागूनच संस्था सचिवाच्या कार्यालयात अत्याधुनिक झेरॉक्स मशीनही तहसीलदारांच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली.
कॉपीच्या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील ओहर या गावातील हे इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे केंद्र आहे.
प्रश्नपत्रिका केल्या जप्त
केंद्राला तहसीलदार रमेश मुंदलोड यांच्या पथकाने दुपारी भेट दिली. तेव्हा पाच खोल्यांतील १२५ विद्यार्थी एका हॉलमध्ये एका बेंचवर दोन असे बसविले होते. परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या. तेव्हा सर्वच विद्यार्थ्यांनी बहुपर्यायी प्रश्नांच्या ठरावीक उत्तरांना टीक मार्क केल्याचे आढळून आले.
केबिनमध्ये झेरॉक्स मशिन
संस्थाचालकाच्या कॅबिनमध्ये झेरॉक्स मशीन आढळून आले. आत संगणकही सुरू होते. परिसरात सीसीटीव्ही असूनही फुटेज उपलब्ध करून देण्यास संस्थाचालकाने टाळाटाळ केली. याविषयी तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. शिक्षण विभागाच्या पथकाने पुढील कार्यवाही केली.
केंद्र संचालकासह पर्यवेक्षक विनामान्यता
परीक्षा केंद्राचे संचालक जी. जे. जाधव हे शिक्षण विभागाकडून मंजुरी घेतलेले शिक्षक नसल्याची बाब समोर आली. त्याचवेळी केंद्रावरील पर्यवेक्षक हे इंग्रजी शाळा, प्राथमिक शाळेवरील शिक्षक असल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे.