तीन विद्यार्थ्यांचा बारावीचा पुन्हा निकाल
By admin | Published: July 10, 2015 03:39 AM2015-07-10T03:39:31+5:302015-07-10T03:39:31+5:30
द्वितीय भाषा विषयाच्या परीक्षेला गैरहजर असल्याने बारावीला नापास झालेल्या तीन विद्यार्थ्यांना हा विषय देणे बंधनकारक असल्याचे माहीत नव्हते,
अमर मोहिते मुंबई
द्वितीय भाषा विषयाच्या परीक्षेला गैरहजर असल्याने बारावीला नापास झालेल्या तीन विद्यार्थ्यांना हा विषय देणे बंधनकारक असल्याचे माहीत नव्हते, असा दावा या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालायात केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने शिक्षण मंडळाला, या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून शुक्रवारी त्यांचा नव्याने निकाल जाहीर करावा, असे आदेश दिले आहेत. एमबीबीएस प्रवेश मिळविण्याएवढे गुण सीईटीमध्ये मिळवूनही बारावीच्या निकालातील घोळामुळे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धनंजय राजकुमार फड, स्वाती भरत गीते, निकिता लक्ष्मण साबळे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरताना इंग्रजी, जिओग्राफी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, क्रॉप प्रॉडक्शन, पर्यावरण शिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण हे विषय घेतले होते. त्यांचा बारावीचा निकाल तांत्रिक कारणास्तव अडवून ठेवण्यात आला होता. याचे कारण देताना बोर्डाने या विद्यार्थ्यांनी इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, हिंदी, संस्कृत किंवा पाली यापैकी एक विषय घेणे अनिवार्य असताना त्याची निवड केलेली नसल्याचे सांगितले. पण द्वितीय भाषा विषय निवडणे बंधनकारक असल्याचे त्यांना माहित नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे. न्या. अनुप मोहता व न्या. ए. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात सरकारी वकील विश्वजीत नामदेव सागरे यांनी हे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असल्यास त्यांना एमबीबीएसला नियमानुसार प्रवेश दिला जाईल, असे स्पष्ट केले.