काळाचा घाला! बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडवले; दोघांचा मृत्यू एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 02:00 PM2018-02-21T14:00:06+5:302018-02-21T14:37:03+5:30
बारावीच्या परीक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार
भोकरदन ( जालना ) : बारावीच्या परीक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जालना रोडवर ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले आहेत. सकाळी 10 च्या दरम्यान झालेल्या या अपघातात अन्य एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तडेगाव वडी येथे राहणारे करण कलुसिंग सुंदरडे व अनिल केसरसिंग घुनावत हे दोघे रामेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी . दोघांचेही १२ वीच्या परीक्षेसाठी भोकरदन येथे केंद्र आले होते. आज पहिलाच पेपर असल्याने ते दोघेही परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी सुनील रूपसिंग घुनावत याच्या दुचाकीवर ( क्रमांक एम एच 21 ए एक्स 9392 ) जात होते. याच दरम्यान शहराजवळील जालना रोडवर असलेल्या कृषी कार्यालयासमोर विरुद्ध दिशेने भोकरदनकडून जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकने ( जीजे 18 ऐक्स 1977 ) त्यांना समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात सुनीलच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अनिल आणि करण गंभीर जखमी झाले होते. अनिल याला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर करण याला उपचारासाठी जालन्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.