बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार महाविद्यालय बदलण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 05:56 AM2019-05-21T05:56:36+5:302019-05-21T05:56:38+5:30
इयत्ता अकरावीतून बारावीत जाताना विविध कारणांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलायची असते. मात्र, महाविद्यालयांकडून त्यासाठी परवानगी दिली जात नाही.
मुंबई : येत्या सन २०१९-२०च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई विभागातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना यासाठी परवानगी द्यावी, असे आदेश मुंबई विभागाचे प्रभारी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिले आहेत.
इयत्ता अकरावीतून बारावीत जाताना विविध कारणांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलायची असते. मात्र, महाविद्यालयांकडून त्यासाठी परवानगी दिली जात नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांवर दबावही टाकला जातो. याबाबत विद्यार्थ्यांकडून शिक्षण विभागाकडे अनेकदा तक्रारीही करण्यात येत असतात. काही विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे महाविद्यालय, शाखा बदलून मिळण्यासाठी परवानगी मागितली होती. या सर्वांची दखल घेत अहिरे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलण्यास मान्यता दिली आहे.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मान्यता देणे आवश्यक
सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव राहात असलेल्या परिसरात महाविद्यालय बदलून मिळणे, शाखा बदलून मिळणे, विद्यार्थ्यांच्या राहण्याचा पत्ता बदलणे, बारावीसाठी शिक्षण मंडळ बदलणे, अशा अनेक कारणांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलता येणार आहे. यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मान्यता देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा बदलल्यानंतर आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माहितीमध्ये त्या सुधारणा करून घेण्याची कार्यवाही संबंधित महाविद्यालयांनी करून घेणे बंधनकारक असल्याचे अहिरे यांनी आदेशात नमूद केले आहे.