तोंडी परीक्षेमुळे फुगला दहावीचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:11 AM2020-07-30T05:11:35+5:302020-07-30T05:12:53+5:30

८० : २० पॅटर्न : यंदा केवळ ४.७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण; ८३ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

huge result of 10th board exam due to oral examination | तोंडी परीक्षेमुळे फुगला दहावीचा निकाल

तोंडी परीक्षेमुळे फुगला दहावीचा निकाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाच्या आदेशानुसार दहावीची परीक्षा ८० : २० पॅटर्ननुसार घेण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळाचा यंदा दहावीचा निकाल विक्रमी लागला आहे. मागील वर्षी २८ हजार ५१६ विद्यार्थ्यांना ९० व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते. मात्र, यंदा ही संख्या ८३ हजारांवर गेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात तब्बल १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.


गेल्या काही वर्षांपासून अनेक शाळांकडून तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना २० पैकी २० गुण दिले जात असल्याची ओरड केली जात होती. त्यामुळे गेल्या वर्षी दहावीचा निकाल केवळ ७७.१० टक्के लागला. त्यामुळे मार्च २०२० परीक्षेसाठी पुन्हा भाषा विषयास तोंडी परीक्षा व सामाजिक शास्त्रे आणि गणित विषयासाठी अंतर्गत मुल्यमापन परीक्षा घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्यानुसार घेतलेल्या परीक्षेमुळे यंदा ऐतिहासिक निकाल लागला.
सर्व विषयांची १०० गुणांची परीक्षा घेतल्यामुळे मागील वर्षी एकाही विभागाचा निकाल ९० टक्क्यांच्या पुढे गेला नव्हता. परंतु, यंदा परीक्षा पद्धतीत बदल केल्यामुळे सर्व विभागांचा निकाल ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. केवळ औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला. तसेच मार्च २०१९मध्ये राज्यातील केवळ २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. मात्र, यंदा २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे सवलतीचे गुण दिले जातात. यंदा सवलतीचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८८ हजार १३१ एवढी आहे.
च्मागील वर्षी १०० गुणांच्या लेखी परीक्षेमुळे २२.९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. मात्र, यंदा केवळ ४.७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे तोंडी परीक्षा व अंतर्गत मुल्यमापनामुळे निकाल फुगल्याचे बोलले जात आहे.



दहावीत ९० टक्क्यांपेक्षा मिळाले अधिक गुण
विभाग २०१९ २०२०
पुणे ५,४३५ १५,४६६
नागपूर १,३८५ ४,७२३
औरंगाबाद ३,५०८ ८,२८२
मुंबई ५,३९९ १४,७५
कोल्हापूर ४,२०७ १२,६५१
अमरावती २,७२५ ८,७१७
नाशिक २,५०६ ८,१९२
लातूर २,५९१ ८,००४
कोकण ७६० २,४७१
एकूण २८,५१६ ८३,२६२

मराठी, इंग्रजीच्या टक्केवारीत वाढ
दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाचा निकाल ९५. ७७ टक्के तर इंग्रजी विषयाचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मराठीच्या निकालात १७.३५ टक्क्यांनी तर इंग्रजीच्या निकालात १४.३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तोंडी परीक्षेमुळे भाषा विषयांचा निकाल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शाळेचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांना २० पैकी २० गुण दिले जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांची सवलतही दिली जाते. त्यामुळे भाषा विषयात उत्तीर्ण होण्यास विद्यार्थ्यांना खूप कमी गुणांची आवश्यकता भासते. यंदा राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला असला तरी मराठी विषयात ४.२३ टक्के तर इंग्रजी विषयात ५.४४ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
यंदा भूगोल विषयासाठी सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सामाजिक शास्त्रे विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल १२ टक्क्यांनी वाढला आहे.

Web Title: huge result of 10th board exam due to oral examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.