भाजीपाल्याचा मुंबईत प्रचंड तुटवडा

By admin | Published: June 3, 2017 04:03 AM2017-06-03T04:03:55+5:302017-06-03T04:03:55+5:30

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई बाजार समितीमधील आवक प्रचंड घटली आहे. भाजी मार्केटमध्ये फक्त १४७ वाहनांची आवक

The huge scarcity of vegetables in Mumbai | भाजीपाल्याचा मुंबईत प्रचंड तुटवडा

भाजीपाल्याचा मुंबईत प्रचंड तुटवडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई/मुंबई : शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई बाजार समितीमधील आवक प्रचंड घटली आहे. भाजी मार्केटमध्ये फक्त १४७ वाहनांची आवक झाली. कांद्याची एकही गाडी आलेली नाही. आवक कमी झाल्याने बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. कोथिंबिरीची छोटी जुडी ५० व मोठी १०० रुपयांना विकली जात होती. इतर भाजीपाल्याचे दरही दुप्पट झाले असून, संप असाच राहिला तर सर्वच भाज्यांचे दर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गुरुवारी ४९४ ट्रक, टेम्पो व इतर वाहनांची आवक झाली होती. परंतु शुक्रवारी राज्यातील शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी पाठवला नसल्याने दिवसभर फक्त १४७ वाहनांचीच आवक झाली. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश व दिल्लीमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. राज्यातून फक्त १० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. आवक प्रचंड घटल्याने होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर झटक्यात दुप्पट झाले. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रतिकिलो ५ ते १२ रुपयांवरून १४ ते ३० रुपयांवर गेले आहेत. भेंडी १० ते १८ रुपयांवरून १४ ते ३२ रुपये, कोबी ८ ते १० रुपयांवरून २० ते २५ रुपये किलो दराने विकली जात होती.

मार्केटमध्ये रोज ५००हून अधिक गाड्यांतील भाजीपाला खाली केला जातो. मात्र शुक्रवारी १२५ गाड्याही खाली झाल्या नाहीत. रात्रीपर्यंत संपावर तोडगा निघाला नाही, तर शनिवारी बाजारात भीषण परिस्थिती निर्माण होईल.
- किरण झोडगे,
अध्यक्ष, भायखळा मार्केट
को-आॅप. प्रिमायसेस सोसायटी

पालेभाज्या नको ग बाई..!
कोथिंबीर, मेथी, पालक अशा नाशवंत पालेभाज्यांना अधिक मागणी असल्याने त्यांचे दरही तिपटीने वाढले होते. गुरुवारी २० ते ३० रुपयांना विकली जाणारी कोथिंबिरीची जुडी शुक्रवारी भायखळा, दादर येथील बाजारांत १२० ते १५० रुपयांना विकली जात होती. मेथी आणि पालक तर बाजारात पाहायलाच मिळाली नाही. याउलट गवारी, भेंडी, दुधी, वांगी या भाज्यांचे दर दीड ते दोन पटीने वाढवून सांगण्यात येत होते.

एपीएमसी काही वेळ बंद
माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांना कोरेगावमध्ये आंदोलन करताना अटक करण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई बाजार समितीमधील कांदा-बटाटा, धान्य व मसाला मार्केट दुपारनंतर बंद ठेवण्याचे आवाहन केले. यामुळे मार्केटमधील बहुतांश व्यवहार थांबले होते.


मुंबई बाजार समिती व किरकोळ मार्केटमधील बाजारभाव (प्रति किलो)

वस्तू३१ मे२ जूनकिरकोळ
फरसबी३० ते ५०६० ते ७०८० ते १००
टोमॅटो५ ते १२१४ ते ३०४० ते ६०
तोंडली८ ते २२८ ते २४४० ते ६०
भेंडी१० ते १८१४ ते ३२६० ते ८०
कोबी८ ते १०२० ते २४५० ते ६०
फ्लॉवर८ ते १०१८ ते २२६० ते ७०
कारली२२ ते २४१८ ते २२४० ते ६०
वाटाणा३४ ते ३७३४ ते ३७५० ते ६०
शेवगा शेंग२० ते २४२४ ते २६४० ते ६०

Web Title: The huge scarcity of vegetables in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.