लोकसभा निवडणूक: कोकणपट्ट्यात उद्धवसेनेला धक्का, ठाणे-तळकोकणातील बुरूज ढासळले!

By नारायण जाधव | Published: June 5, 2024 10:54 AM2024-06-05T10:54:45+5:302024-06-05T10:59:08+5:30

ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी-सिंधुदुर्गात मोठे पराभव

Huge setback to Uddhav Thackeray in Lok Sabha Election Result 2024 as Shivsena lost in Konkan Thane Palghar Raigad | लोकसभा निवडणूक: कोकणपट्ट्यात उद्धवसेनेला धक्का, ठाणे-तळकोकणातील बुरूज ढासळले!

लोकसभा निवडणूक: कोकणपट्ट्यात उद्धवसेनेला धक्का, ठाणे-तळकोकणातील बुरूज ढासळले!

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुंबई किंग कोण याचे उत्तर लाेकसभेच्या निकालातून मतदारांनी उद्धवसेनेच्या बाजूने दिले आहे. मात्र, आतापर्यंत उद्धवसेनेचाच बालेकिल्ला असलेल्या ठाणेसह कोकणपट्ट्यातील पक्षाचे सर्वच बुरूज मात्र ढासळले आहेत. विशेष म्हणजे यात काँग्रेस आणि आणि शरद पवार गट सोबत असतानाही उद्ववसेनेचे ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी- सिंधुदुर्गातील सर्वच बुरूज ढासळल्याने आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेला मोठी डागडुजी करावी लागणार आहे, हे लोकसभेच्या निकालांनी दाखवून दिले.

महाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेस, मराठवाड्यात उद्धवसेना आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेससह शरद पवार गटाने महायुतीला जाेरदार धक्के देऊन धोबीपछाड केले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करून पक्षावर ताबा मिळवल्यावर राजधानी कोणाची, ‘सत्या’ चित्रपटातील डायलाॅगप्रमाणे मुंबई का किंग कोण? याची चर्चा होत होती. या चर्चेचे उत्तर मतदारांनी मुंबईतील सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीच्या पारड्यात दान टाकून दिलेे आहे. मुंबईतील चार जागांवर उद्धवसेनेचे शिलेदार निवडून आले आहेत. उद्धवसेनेच्या सहकार्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्याने त्या पक्षाच्या आशाही जिवंत केल्या आहेत.

असे असले तरी मुंबईनजीकचा जिल्हा असलेला आणि एकसंघ शिवेसेनेला पहिला महापौर देणाऱ्या ठाणे शहरासह जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या दोन मतदारसंघांत शिंदेसेनेचे नरेश म्हस्के आणि कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांच्या विजयामुळे ‘ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे’ अथवा ‘शिवसेनेचा बालेकिल्ला, ठाणे जिल्हा’ या आनंद दिघेंच्या काळात दिल्या जाणाऱ्या घोषणा आता शिंदेसेनेच्या बाजूला झुकल्या आहेत. ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचे दणदणीत विजय झाले आहेत. तर तिकडे पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचा भाग असलेल्या पालघरची खासदारकी भाजपाने पुन्हा बळकावली आहे. येथून उद्धवसेनेच्या भारती कामडी यांचा भाजपाच्या हेमंत सवरा यांनी पराभव केला आहे.

रायगड जिल्ह्यात उरण, पनवेल, कर्जत या तालुक्यांचा भाग असलेल्या मावळ मतदारसंघात शिंदेसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी उद्धवसेनेच्या संजोग वाघेरे पाटील यांचा मोठा पराभव केला आहे. विशेष म्हणजे वाघेरे यांची उमदेवारी सर्वांत आधी महाविकास आघाडीच्या जागांची बाेलणी होण्याआधीच ठाकरेंनी जाहीर केली होती. तर महायुतीचे श्रीरंग बारणे यांची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर झाली होती. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी उद्धवसेनेच्या अनंत गीते यांना दणदणीत धूळ चारली आहे. तर उद्धवसेनेने सर्वांत प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पराभवासाठी जंगजंग पछाडूनही राणे यांनी उद्धवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी दणदणीत पराभूत केले आहे. अशाप्रकारे एकेकाळी मुंबईनंतर शिवसेनेला संजीवनी देणारे उद्धवसेनेचे कोकणातील सर्वच बुरूज या लोकसभा निवडणुकीत पूर्णत: ढासळल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Huge setback to Uddhav Thackeray in Lok Sabha Election Result 2024 as Shivsena lost in Konkan Thane Palghar Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.