‘हुक्का पार्लर’ला ‘कोप्टा’ लागणार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:33 PM2018-03-23T23:33:00+5:302018-03-23T23:33:00+5:30
राज्यात हुक्का पार्लरमध्ये होत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला चाप लावण्यासाठी, हुक्का पार्लरचा समावेश केंद्र सरकारच्या सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यात (कोप्टा अॅक्ट) करण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात येणार असल्याची यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
मुंबई : राज्यात हुक्का पार्लरमध्ये होत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला चाप लावण्यासाठी, हुक्का पार्लरचा समावेश केंद्र सरकारच्या सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यात (कोप्टा अॅक्ट) करण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात येणार असल्याची यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
राष्ट्रवादीचे सदस्य प्रकाश गजभिये यांनी मद्यपान, धूम्रपान, तंबाखूच्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत राज्य सरकारकडून आरोग्यमंत्री दीपक सावंत, अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आपापल्या खात्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे दिली. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेला नियंत्रणात आणताना उच्च्भ्रू समाजात बोकाळलेल्या ई सिगारेटवर बंदी घालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केले. ई सिगारेट हे हल्ली आलेले उच्चभ्रू समाजातील व्यसन आहे. यात सिगारेटला धूर येत नाही. यात द्रव रूपातील शुद्ध निकोटीन वापरले जाते. त्यामुळे नेहमीच्या सिगारेटच्या तुलनेत जास्त हानिकारक आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवाय, तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना जरब बसेल, या दृष्टीने कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुटख्यावरील बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे काम चालू आहे. यातील दोषी व्यक्तीला तीन वर्षांपासून जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंतची तरतूद यात असेल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली.